पुणे विभागात आता ‘बारामती पॅटर्न’ची चर्चा आहे. विभागांत सर्वाधिक निकाल (९८.३७) बारामती तालुक्याचा लागला आहे. यावर्षीचा विभागाचा निकाल ९५.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात साधारण अडीच टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. विभागांतील साडेआठ हजार विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. पुणे विभागात पुणे, नगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्य़ांचा समावेश होतो. यावर्षी पुणे विभागाच्या निकालात बारामती तालुक्याने बाजी मारल्याचे दिसत आहे. बारामती तालुक्याचा निकाल ९८.३७ टक्के लागला आहे.
यावर्षी विभागातून २ लाख ५४ हजार ५८ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ लाख ४१ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९५.१० टक्के आहे. विभागांतील ८ हजार ५३८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी विभागात मुलींची सरशी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागाचा निकाल वाढला असून गेल्यावर्षी ९२. ३५ टक्के निकाल लागला होता. राज्यात पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कोकण, कोल्हापूर विभाग पुण्यापेक्षा सरस ठरले आहेत. मात्र, राज्यात शंभर टक्के निकाल लागलेल्या सर्वाधिक शाळा पुणे विभागात आहेत. विभागातील १ हजार ५५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विभागातील ४९.८९ टक्के पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्हानिहाय निकाल
पुणे – ९६.३९
नगर – ९५.४३
सोलापूर – ९२.१४
पुणे विभागाचा पाच वर्षांतील निकाल
वर्ष        निकालाची टक्केवारी
२०१५    ९५.१०
२०१४    ९२.३५
२०१३    ८२.२२
२०१२    ८५.१२
२०११    ८०.३९