कुठल्याशा बेटावर चार मराठी माणसं आहेत असे समजले तरी हे लोक तेथे जाऊन साहित्य संमेलन घेतील, अशी टिप्पणी करीत ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी संमेलनातून साहित्य किती पुढे जाते, असा परखड सवाल शुक्रवारी केला.
‘महात्मा फुले समता’ पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ‘शहाणपणाला मर्यादा असतात. मूर्खपणाला हद्द नसते’ या वॉल्टेअर यांच्या जगप्रसिद्ध विधानाचा संदर्भ देत भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलन आणि अनुषंगिक बाबी या उंटावरून शेळ्या हाकण्याचेच काम असल्याची टिप्पणी केली. संमेलनात कष्टकरी लोक किती आहेत, संमेलनातून मराठी संस्कृती दिसते का, ती प्रतििबबित होते का, असे प्रश्न विचारत या अभावामुळे त्यामुळे हे सारे अनाठायी वाटते. संमेलनातून साहित्य किती पुढे जाते हा खरा प्रश्न आहे, असे सांगून ते म्हणाले, चुकून काही लोक यांना सापडतात. जे सापडतात ते नंतर पस्तावतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अधिक पैसे मिळतील. पण, त्याने भाषा जतन आणि संवर्धनाचे प्रश्न सुटणार नाहीत.
मातृभाषा नीट आलीच पाहिजे. एवढेच नव्हे तर, आपल्याला स्वप्नंसुद्धा मराठीत पडली पाहिजेत. आधी घरात मराठी ठीक करा. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात, पण मराठीसाठी काय करतात? कनार्टकात नाही चालत असे. मग, महाराष्ट्रात मराठीपेक्षा इंग्रजीला प्राधान्य का, असा सवाल करीत नेमाडे यांनी इंग्रजी शाळा बंद कराव्यात, असे मत व्यक्त केले.
मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, अशी शिफारस भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता नेमाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझे शिक्षण मराठीतून झाले. मग, माझे कुठे अडले का, असा सवालही त्यांनी केला. शिकायचेच असेल तर शेजारी राष्ट्र म्हणून इंग्रजीआधी चिनी भाषा शिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. मराठी ही जगातील १५ वी मोठी भाषा आहे. त्यामुळे भाषा राहील की नाही याची काळजी करण्याचे कारण नाही. जे बोलतात त्यांची काळजी केली पाहिजे, असा टोलाही नेमाडे यांनी लगावला. इंग्रजी भाषा आली पाहिजे याविषयी दुमत असण्याचे कारण नाही; पण वसाहतवादाचा पुरस्कार करीत शंभर टक्के लोकांनी इंग्रजी शिकले पाहिजे हा आग्रह धरणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.