सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६ वे वर्ष असताना देखील पुणे महापालिकेच्यावतीने १२५ वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने आजपासून २३ तारखेपर्यंत चक्री उपोषणास सुरु केले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला.

मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले, यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६वे वर्ष असून देखील हे सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. याच्या निषेधार्थ आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव सुरु होण्यास अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून सरकारने भुमिका जाहिर करावी. अन्यथा आमचा लढा अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी यापूर्वी मंडळाकडून मंडई येथिल चौकात काळया फिती बांधून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महापालिकेच्या भूमिकेचा निषेध करीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका जाहिर केली होती.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले आहे. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकले आहे. बोधचिन्हाचा आकार मर्यादित असल्याने त्यावर लोकमान्य टिळकांचे छायाचित्र वापरले नसल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याने त्यांचा सन्मान ठेवावा, अशी मागणी श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्यावतीने मागील दोन वर्षांपासून करण्यात येत आहे.