सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतरही तडजोडीची तयारी

महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत थेट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ‘कारभारी बदला’ मोर्चा काढण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली असली तरी पुण्यात सेनेबरोबर युती करायची का नाही याबाबत भाजपने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. युतीसाठी शिवसेना कोणत्याही तडजोडी करणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली असली तरी युतीबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, हा निर्णय स्थानिक पातळीवर व्हावा, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केली.

महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार की नाही, यावरून सध्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतप्रवाह आहेत. मात्र शिवसेनेने थेट पुण्याचा कारभारी बदला अशीच हाक दिली आहे. महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या तसेच राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात शिवसेनेने ‘कारभारी बदला’ मोर्चा आयोजित केला असून मंगळवारी (२५ ऑक्टोबर) हा मोर्चा होणार आहे.

या पाश्र्वभूमीवर निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या रावसाहेब दानवे यांना युतीबाबत विचारले असता त्यांनी युती करण्याचा अधिकार स्थानिक नेत्यांना दिला आहे आणि सन्मानपूर्वक युती व्हावी अशी भूमिका जाहीर केली. शिवसेनेबरोबर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र युती करावी का नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात यावा. सन्मान होणार नसेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. निवडणुकीनंतर भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल, असाही दावा त्यांनी केला.

भाजप शहराच्या विकासात अडथळे आणत आहे व भाजपची राष्ट्रवादीला साथ आहे. त्यामुळेच शहरातील कामे रखडली आहेत. त्यामुळेच कारभारी बदलावा लागणार आहे, असा पवित्रा शिवसेनेने घेतला असला तरी तूर्त भाजपने युतीची दारे अद्याप खुली ठेवली आहेत. पक्षातील सर्वाशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

कोण काय म्हणाले?

शिवसेनेबरोबर चर्चा करू; पण युती सन्मानपूर्वक होईल,

– रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

शिवसेना स्वबळावरच लढेल.

– विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना

पक्षातील सर्वाशी चर्चा करून नंतर युतीबाबत निर्णय घेऊ.

– गिरीश बापट, पालकमंत्री