firasta-blog_ambar-karveअगदी परवाच कर्वेनगरला अलंकार पोलीस चौकी जवळून जाताना रस्त्याच्या कडेला कांद्याच्या गोण्या लावलेल्या दिसल्या. खरंतर एका कामाला निघालो होतो, घाईत पुढे निघून चाललो होतो, पण कुतूहलाने गाडी वळवून परत गेलो.
एकटाच माणूस होता विकणारा. चौकशी केली तर चार महिने जुना १० किलो कांदा १०० रुपयांना असं समजलं. माणसाचं नाव सुधीर डहाळे, नारायणगावाच्या बाजूला कुठेतरी घरची शेती आहे वडील, भाऊ शेती बघतात. ह्यावर्षी कांद्याचे उत्पादन भरपूर झाल्याने कांद्याला मार्केटमध्ये भाव मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे बराच कांदा शिल्लक आहे.
शेतकऱ्यांचे अनेक मोर्चे निघाले, धरणे आंदोलनं झाली, काही शेतकऱ्यांनी अगदी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललं. पण फक्त शेतमालच असं नाही, कुठल्याही उत्पादकाला बनवलेला तयार माल घरात पडून राहिला तर कधी पैसा मिळतो का? अगदीच अपवाद सोडून, तयार माल विकल्याशिवाय कोणालाच कधी पैसा मिळत नाही, मिळणारही नाही. त्याची कोंडी शेवटी उत्पादकालाच फोडायला लागते.
मध्यंतरी कांद्यावर मी एक पोस्ट लिहिली होती. बाजार समितीत साधारण १०० किलोच्या बदल्यात १.२५ रुपया मिळालेल्या जुन्नर बाजूच्या एका शेतकऱ्याची बाजू त्यात दाखवली होती. ती पोस्ट बरीच फिरून त्या शेतकऱ्याची मुलाखत CNBC सारख्या अर्थविश्वातल्या सगळ्यात मोठ्या चॅनेलनी घेतली होती. (ह्या पोस्टचा उद्देश ते सांगून स्वतःचा उदोउदो करून घ्यायचा नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी). पण ती कोंडी शेतकऱ्यांनाच फोडायला लागेल असा पोस्टमध्ये मांडायचा प्रयत्न केला होता.
डहाळे कुटुंबियांनी नेमकं हेच केलं, हे सांगणे ह्या पोस्टचा खरा उद्देश आहे. त्यांनी आपला कांदा थेट ग्राहकांनाच विकायचं ठरवलं. त्यांचाही कितीतरी क्विंटल कांदा पडून आहे. त्यांनी त्याच्या १०-१० किलोच्या गोण्या बांधल्या. घरचे गावाला असतात, सुधीर रोज सकाळी त्या टेंपोत टाकून एकटाच २-३ वेगवेगळ्या भागातल्या रस्त्याच्या कडेला गोण्या मांडून बसतो. संध्याकाळपर्यंत जेवढ्या गोण्या विकल्या जातील तेवढ्या विकून घरी जातो. तेवढेच पैसे रोज घरात येतात.
त्याची सगळी माहिती घेईपर्यंत त्या भागातले माझे ओळखीचे एकदोन जणं बोलायला थांबले. त्यांनीही कांदा पाहिला. त्यांनाही सुधीरची माहिती सांगितल्यावर, त्यांनीही लगोलग एकेक गोणी कांदा विकत घेऊन टाकला. पैसे त्यांनी दिले आणि सुधीरकडून धन्यवाद मलाच मिळाले. मीपण एकदम खूश, दिवस छान गेला.
kandewala-sudhirभाव नाही म्हणून घरात कांद्याचा साठा करून रडत बसलेले तर कैक शेतकरी आज आहेत, आपल्यासारख्या शहरातल्या माणसांना ते दिसत नाहीत एवढच. माझ्यासारख्याला कांद्यातले काही समजतं अशातला काहीही भाग नाही, पण त्या प्रश्नाची आणि त्याहीपेक्षा शेतकऱ्याची निकड आपल्याला नक्कीच समजून घेता येते. त्याकरता आपल्याकडून एक छोटे पाऊल म्हणून खऱ्या शेतकऱ्याकडून तो दिसेल तेव्हा, त्याच्याकडून जमेल तेवढी खरेदी करणे आपल्याला नक्कीच करता येतं.
तुमच्याही भागात येताजाता कोणीतरी सुधीर काहीतरी तरी विकत बसलेला असणारच, गरज आहे ती आपले काम २ मिनिटे बाजूला ठेऊन गाडी वळवून त्यांच्याकडे पोचायची.
– अंबर कर्वे