कल्याण गंगवाल संस्थापक सर्व जीव मंगल प्रतिष्ठान

नाशिक-पुणे महामार्गाजवळील संगमनेर हे माझे मूळ गाव. वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर मी पुण्यामध्ये स्थायिक झालो आणि शाकाहार, व्यसनमुक्ती, पशुबळी यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची प्रेरणा मला वाचनामुळे मिळाली. माझ्या आईला आध्यात्मिक पुस्तकांच्या वाचनाची आवड होती. त्यामुळे आमच्या घरामध्ये आध्यात्मिक पुस्तके मोठय़ा प्रमाणात होती. आमच्या गावामध्ये दिगंबर जैन म्हणून आमचे एकच कुटुंब. त्यामुळे आचार्य कुंदकुंद यांचे धार्मिक ग्रंथ घरामध्येच लहानपणापासून वाचनात आले. संयमी जीवन जगण्याची प्रेरणा आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा लहानपणापासूनच मनामध्ये निर्माण झाल्याने समाजातील विविध क्षेत्रांसाठी काम करण्यासाठी मी प्रवृत्त झालो. शाळेच्या वाचनालयापासून ते देश-विदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या पुस्तक मेळाव्यांमध्ये पुस्तके खरेदी करण्याची माझी आवड आजही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. सदाचार, शाकाहार आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मी केलेल्या कामाची मुहूर्तमेढ लहानपणी आध्यात्मिक ग्रंथ आणि महापुरुषांच्या आत्मचरित्र वाचनामुळे झाली होती. त्यामुळे माझ्या जीवनाला सामाजिकतेकडे नेत योग्य दिशा देण्याचे काम केलेल्या पुस्तकांना मी माझ्या यशस्वी जीवनाचे श्रेय देईन.

संगमनेरमधील सर डी. एम. पेटिट हायस्कूलमध्ये माझे शिक्षण झाले. खरंतर वैद्यकीय व्यवसायाकडे जाण्याचा मार्ग मला शालेय जीवनात गवसला. इयत्ता आठवीमध्ये असताना ‘देवाचे घर’ हे नाटक आम्ही केले होते. नगरला जिल्हास्तरीय नाटय़स्पध्रेत ते नाटक खूप गाजले. समाजासाठी काम करणारा सेवाभावी डॉक्टर, ही त्यातील मूळ संकल्पना होती. त्यामध्ये डॉक्टरची भूमिका मी साकारली होती. प्रेक्षकांप्रमाणेच मलाही ती भूमिका इतकी भावली की मी पुढे डॉक्टरच व्हायचे, असे मनाशी पक्के केले. शाळेच्या ग्रंथालयामध्ये सातत्याने जाणे होत होते. त्यामुळे एखादे पुस्तक आवडले की पटकन घ्यायचे आणि रात्री वाचन करायला बसल्यानंतर पुस्तक वाचून संपेपर्यंत थांबायचे नाही हा रिवाज होता. अशाप्रकारे मी वाचनाच्या प्रेमातच पडलो. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वर, महात्मा गांधी अशा महापुरुषांची चरित्रे मी वाचली. त्यानंतर मी आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाकडे वळू लागलो. मॅट्रिकला असताना संस्कृत विषय घेऊन मी अभ्यास सुरू केला. त्यामुळे समयसार, नियमसार, प्रवचनसार असे आध्यात्मिक ग्रंथ वाचून काढले आणि त्या वाचनाचा पगडा माझ्या जीवनावर पडला. त्यातील काही ग्रंथ िहदीमध्ये असल्याने िहदी साहित्याच्या वाचनालादेखील सुरुवात झाली होती.

माझ्यावर समाजसेवी भावना लहानपणापासून पुस्तकांमधून िबबवली गेली. त्यामुळे आपण केवळ स्वत:साठी नाही, तर दुसऱ्यासाठी जगायचे हे संस्कार माझ्यावर झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे व्यवसाय जरी केला, तरी मिळालेल्या रकमेतील ५० टक्के भाग हा समाजासाठी खर्च करायचा, असे ठरवले होते. हा नियम मी आजही काटेकोरपणे पाळत आहे. अिहसा, करुणा याविषयी जनजागरण करायचे, म्हणजेच धर्मासाठी काम करायचे. त्यामुळे बलगाडा शर्यती, पशुबळी यांसारख्या मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मी न्यायालयात आवाज उठवला. माझा वैद्यकीय व्यवसायाशी संबंध असल्याने प्राणीविषयक कायद्याचे ज्ञान नव्हतेच. परंतु प्राण्यांचे अधिकार, कत्तलखान्याचे नियम याविषयी संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, याचा सखोल अभ्यास आणि वाचन मी सुरू केले. त्या वाचनाच्या जोरावरच न्यायालयामध्ये या विरोधात मी लढा देऊ शकलो.  लहानपणी सतीप्रथेबद्दल अनेकदा वाचले होते. बंगालमध्ये ही प्रथा बंद केल्याचेदेखील वाचनात आले. तर माणसाच्या करमणुकीसाठी प्राण्यांच्या शर्यती देश-विदेशात लावल्या जात असल्याचेही वाचनात आले. तेव्हापासून भारतातील या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून काहीतरी करायचे, हे मी मनाशी पक्के केले. त्याकरिता दर शनिवार-रविवार मनोरंजन करण्याकरिता एखाद्या रिसॉर्टवर जाऊन दारूची पार्टी करण्यापेक्षा पुस्तकांमध्ये रमणे मला जास्त आवडते. त्यामुळे माणसांपेक्षा मी नेहमीच वैचारिक ग्रंथ आणि पुस्तकांना माझे मित्र मानले. अमृतानुभवापासून ते कुराण, बायबलसारख्या ग्रंथांचे दररोज किमान एक तास वाचन केल्याशिवाय झोपायचे नाही, असा नियम मी स्वत:ला घालून घेतला. या वाचनामुळेच पशुदयेसारख्या विषयापासून ते व्यसनमुक्तीसारख्या विषयांवरील आंदोलनांमध्ये सबळ पुरावे आणि शास्त्रीय सिद्धान्तानुसार मी माझे मत मांडू शकलो.

व्यसनमुक्तीविषयी आम्ही केलेल्या आंदोलनामध्ये मी केलेल्या वाचनाचा मला खूप उपयोग झाला. टाटा कॅन्सरचे रीसर्च सेंटरचे प्रतिनिधीदेखील यामध्ये माझ्यासोबत होते. त्यामुळे या विषयासंबंधीच्या पुस्तिका, माहितीपत्रके काढून प्रदर्शनांद्वारे गुटख्याचे दुरुपयोग आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. त्याकरिता विविध संदर्भ पुस्तके वाचनात केलेल्या नोंदी मला उपयोगी पडल्या. एका परदेशी लेखकाने ‘सेव्ह द ग्लोब’ हे पृथ्वी वाचविण्यासाठी शाकाहार किती गरजेचा आहे, याविषयी लिहिलेले पुस्तक आजही मला प्रेरणा देते. या पुस्तकाचा आधार घेत आणि इतर वैद्यकीय संशोधन कागदपत्रांच्या अभ्यासाद्वारे आम्ही अमेरिकन शास्त्रज्ञांसोबत शाकाहार हा किती उपयुक्त आहे, याविषयी संशोधन करू शकलो. प्राण्यांची कत्तल करण्यापेक्षा आपण ‘व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस’ म्हणजेच मुक्या प्राण्यांचा आवाज व्हावे, असे मला नेहमी वाटे. त्यामुळे एकविसाव्या शतकात ‘चार्टर फॉर अ‍ॅनिमल राईट्स’ याविषयी आम्ही चळवळ उभी करणार आहोत.

व्यसनमुक्ती, शाकाहार या विषयांसोबतच ना. सी. फडके, र. वा. दिघे, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील या लेखकांच्या पुस्तकांसह ‘ययाती’, ‘पानिपत’, ‘मृत्युंजय’ यांसारख्या कादंबऱ्या मला आवडतात. वैद्यकीय क्षेत्रात काम सुरू असल्याने विविध ठिकाणी प्रवास होत असे. त्यामुळे गाडीमध्ये किंवा विमानात प्रवास करताना पुस्तके वाचणे आणि सीडी ऐकण्याचा छंद आजही कायम आहे. माझ्या बुकशेल्फमध्ये १० ते १५ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे माझी पुस्तके वाचून झाल्यानंतर विविध धार्मिक संस्थांना मी पुस्तके भेट देतो. मंदिरामध्ये दिलेल्या पुस्तकांवर ज्याला हवे त्याने घेऊन जावे.. अशी चक्क पाटीदेखील लिहितो. तर माझे मित्र-मत्रिणी माझ्याकडील पुस्तके वाचायला घेऊन जातात. वाचनसंस्कृतीमुळे माणसाच्या विचारात आणि आचारात आमूलाग्र बदल होतो. कोणत्याही क्षेत्राशी निगडीत व्यक्ती वाचनसंस्कारामुळे समाजाकरिता काम करण्यासाठी उद्युक्त होऊ शकतो. त्यामुळे पुस्तके आणि वाचनाची प्रेरणा समाजाच्या तळागाळात पोहोचविण्याकरिता माझे प्रयत्नदेखील सुरू आहेत.