वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणूक करणारे लोक जागोजागी असतात.. कधीकधी फसवणुकीचे नवनवे फंडे वापरले जातात, तर कधी जुन्याच पद्धती वापरून फसवणूक केली जाते. प्रत्येक वेळची शिकार वेगळी असल्याने व अनेकदा लाभ मिळण्याच्या आशेमुळे लोक फसतात व ठगांचे फावते.. चिंचवड येथे बुधवारी फसवणुकीचा असाच एक साधा किस्सा घडला. ‘शंभर रुपयांचे स्क्रॅच कुपन घ्या अन् भरघोस बक्षिसे मिळवा’, या भुलथापेला एक जण बळी पडला.. पण, फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र त्याने पोलिसांचा आधार घेतल्याने तीन जण पोलिसांच्या तावडीत सापडले.
फसवणूक करण्याच्या नानाविध पद्धती ठगांकडून आणल्या जातात. काही जुन्याच पद्धती नवा मुलामा देऊन वापरल्या जातात. कधी लाखांची, तर कधी काही हजारांत फसवणूक केली जाते. चिंचवडमध्ये घडलेला हा प्रकार किरकोळ असला, तरी जुनीच पद्धत नव्याने आणून नव्या प्रकाराने फसवणूक करण्याचा तो एक नमुना आहे. सुरुवातीला शंभर रुपये खर्च करण्यास सांगून नंतर मोठमोठय़ा बक्षिसांचे आमिष दाखविण्याचा फंडा ठगांनी वापरला. या प्रकरणात संभाजी दादाराव सोनवणे (वय ५२), किरण ऊर्फ रामा खंडू घाडगे (वय २४), रियाज राज अहमदखान (वय २४ तिघे रा.गवळी माथा, टेल्को रस्ता, भोसरी) या तिघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अशोककुमार यादव (वय २३, रा. मोरया कॉलनी, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
यादव हे बुधवारी दुपारी चिंचवडच्या शाहुनगर भागातील एसबीआय बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. बँकेतील काम संपवून ते बाहेर आले असता, आरोपींनी त्यांना गाठले. ‘आपच्या कंपनीची स्कीम असून, त्यात तुम्ही शंभर रुपयांचे स्क्रॅच कुपन घेतल्यास त्यावर कार, सायकल, फ्रिज त्याचप्रमाणे इतर वस्तू मिळतील,’ असे आमिष त्यांनी दाखविले. शंभर रुपयांचे ते कुपन घेतल्यानंतर आणखी साडेसहाशे रुपये भरण्यास सांगितले. त्याचप्रमाणे अडीच हजार रुपये भरल्यास बारा हजार रुपये मिळतील, असे सांगून त्यांनी यादव यांच्याकडून पैसे उकळले. कार्यालयामधून कागदपत्रं आणून व्यवहार पूर्ण करण्याचे कारण सांगून ते तेथून निघून गेले.
ठगांकडून फसल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी पोलीस मार्शलला घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी काही माहिती घेऊन काही वेळांतच आरोपींना पकडले. आरोपींकडून पोलिसांनी एक स्कॉर्पिओ मोटार, रोख रक्कम व ओम साईबाबा ग्रुप भव्य कार्मेटींग योजनेची तिकिटे असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.