सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) हद्दीतून जाणारा आणि बोपखेल व दापोडी यांना जोडणारा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव नागरी वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले. हा रस्ता खुला करावा, या मागणीवरून गेल्या आठवड्यात बोपखेल ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलीसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. यामध्ये शेकडो नागरिक आणि पोलीस जखमी झाले होते. पोलीसांनी १८९ ग्रामस्थांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी १७२ जणांना जामीन मिळाला आहे.
बोपखेलवासियांना दापोडीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता देण्यात यावा. त्यासाठी जिल्हाधिकाऱयांसोबत शुक्रवारी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. बोपखेल आणि दापोडीला जोडण्यासाठी पूल बांधण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या पूलाचे काम होत नाही, तोपर्यंत तात्पुरता पूल उभारण्यासही लष्कराने तयारी दर्शविली आहे. पर्रिकर यांनीही तात्पुरत्या पूल बांधण्यास होकार दिला आहे. मात्र, सीएमईमधून जाणारा रस्ता नागरी वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्रिकर गुरुवारी पु्णे दौऱयावर आहेत. त्यावेळी राज्यसभेतील खासदार अमर साबळे, बोपखेल ग्रामस्थ, जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून सीएमईमधील रस्ता वापरण्यावरून ग्रामस्थ आणि लष्कर यांच्यामध्ये वाद होता आहेत. त्यातच उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लष्कराने हा रस्ता नागरी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.