काँग्रेसला ७१; तर राष्ट्रवादी ११० जागांवर अडून

महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्यासाठीचा आणि जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसकडून पाठविण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या आघाडीबाबत नेहमीप्रमाणे आकडय़ांचा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसला ७१ आणि राष्ट्रवादीला ९१ जागा असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. तर राष्ट्रवादीकडून त्या पक्षाला ११० जागा आणि काँग्रेसला ५२ जागा असा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांमुळे आघाडीतील जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही काँग्रेसकडून यासंदर्भात येत्या दोन दिवसांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून आघाडी बाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळेही आघाडी होणार की नाही, याबाबत साशंकतता निर्माण झाली होती. पण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आघाडी करण्यासंदर्भात विचार सुरू झाला. त्यानुसार काँग्रेसकडून राष्ट्रवादीला तसा प्रस्तावही देण्यात आला.

काँग्रेसच्या प्रस्तावानुसार काँग्रेसला ७१ जागा हव्या आहेत आणि ९१ जागांवर राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांच्या सध्याच्या जागा त्याच नगरसेवकांना मिळाव्यात, गेल्या निवडणुकीत ज्या जागेवर ज्या पक्षाच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती, ती जागा त्या पक्षाला सोडावी आणि उर्वरित जागा समप्रमाणात वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १६२ जागांपैकी ११० जागा लढवेल आणि ५२ जागा काँग्रेसला दिल्या जातील, असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही आहेत. संख्याबळ आणि गेल्या निवडणुकीतील जागा वाटपाचे सूत्र हे निकष त्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे आघाडीचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, परस्परविरोधी प्रस्ताव आल्यानंतर आणि चर्चेला प्राथमिक सुरुवात झाल्यामुळे दोन्ही पक्षांकडून चर्चेसाठीही काही जणांची नियुक्ती करण्या येणार आहे. प्रारंभी चर्चा होऊन नंतर जागा वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची येत्या दोन दिवसांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

आघाडी झाली तर काँग्रेसला किंमत राहणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करू नये, अशी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाकडूनही आघाडीला विरोध करण्यात आला आहे. १३२ वर्षांच्या काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा विचारही करू नये. आघाडी झाल्यास पंजा या चिन्हाचे नुकसान होईल. काँग्रेसला विधानसभेच्या वेळी शून्य किंमत राहील, पुढील निवडणुकीत मते मागताना फाटकी तुटकी झोळीपण शिल्लक राहणार नाही, असा इशारा काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाने दिला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत गोड बोलून राष्ट्रवादीने आघाडी केली पण काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नाही. राष्ट्रवादीची निर्मिती काँग्रेसच्या द्वेषातूनच झाली आहे. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असा सल्लाही जुन्या जाणत्या ज्येष्ठ मंडळींनी दिला आहे.