मुंबईतील कामामुळे वाहतुकीवर परिणाम

ठाकुर्ली येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने रविवारी (२० ऑगस्ट) मुंबईसह पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. या कामामुळे पुणे- मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही गाडय़ांच्या वाहतुकीतही बदल करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम २० ऑगस्टला सकाळी सव्वानऊ ते दुपारी पावणेएकच्या दरम्यान करण्यात येणार आहे. या वेळेत या भागातील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आणि गोदावरी एक्स्प्रेस या गाडय़ाही रद्द करण्यात येणार आहेत.

पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या इतर मेल किंवा एक्स्प्रेस गाडय़ा कर्जत, दिवा, पनवेल या मार्गाने सोडण्यात येतील. त्याचप्रमाणे या गाडय़ा नियोजित ठिकाणी सुमारे १० ते ४० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी या गाडय़ा दिवा स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, हैदराबाद- मुंबई एक्स्प्रेस, चेन्नई- मुंबई एक्स्प्रेस या गाडय़ांचा त्यात समावेश असेल. मुंबईतून दक्षिण, पूर्व जाणाऱ्या मेल किंवा एक्स्प्रेस गाडय़ाही दिवा, पनवेल, कर्जत या मार्गाने सोडण्यात येतील. मुंबईहून कर्जत, लोणावळामार्गे जाणाऱ्या काही गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी १०.५५ वाजता सुटणारी काकीनाडा एक्स्प्रेस दुपारी एक वाजता सुटेल.