सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सनसिटी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मंडईचा वापर तातडीने सुरू करावा आणि मंडई खुली करणे शक्य नसेल, तर त्या इमारतीत महापालिकेने सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय सुरू करावे, अशी मागणी होत असून तशी मागणी आता शिवसेनेकडूनही करण्यात आली आहे.
सनसिटी रस्त्यावर महापालिकेने सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून मंडई बांधली आहे. या ठिकाणी २२० गाळे बांधून तयार आहेत आणि तरीही वर्षांनुवर्षे या मंडईचा वापर होत नसल्यामुळे मंडईसाठी बांधलेली इमारत वापराअभावी पडून आहे. ही मंडई खुली केल्यास सिंहगड रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर या नव्याने बांधलेल्या मंडईत केले जाऊ शकते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. गाळेवाटप होत नसल्यामुळे या मंडईचा वापर अद्याप सुरू होऊ शकलेला नाही, असे पत्र शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सोमवारी आयुक्तांना दिले.
मंडईच्या गाळेवाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच मंडई खुली करणे शक्य नसेल, तर महापालिकेचे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय या जागेत सुरू करावे. या परिसरात क्षेत्रीय कार्यालय नसल्यामुळे नव्याने क्षेत्रीय कार्यालय सुरू केल्यास नागरिकांची सोय होणार आहे. तसेच या परिसरात पार्किंगचीही सुविधा असल्याने क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमुळे तेथे होणाऱ्या वाहतुकीचा त्रास होणार नाही. या बाबी विचारात घेऊन मंडईचे रूपांतर क्षेत्रीय कार्यालयासाठीच्या इमारतीत करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.