डेंग्यूचे ९३; चिकुनगुनियाचे १५० रुग्ण

पुण्यात गुरुवारी एकाच दिवशी डेंग्यूसदृश आजाराचे तब्बल १०३ रुग्ण सापडले असून त्यातील ९३ रुग्णांची डेंग्यूची चाचणी सेंटिनेल प्रयोगशाळेमधून ‘पॉझिटिव्ह’ आली आहे. इतकेच नव्हे तर चिकुनगुनियाचेही एकाच दिवशी १५० रुग्ण सापडले आहेत. या दोन्ही आजारांचे एकाच दिवशी एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्ण सापडण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे.

अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी पुणेकरांसाठी चांगल्याच ‘ताप’दायक ठरत आहेत. पावसाचे स्वच्छ पाणी अगदी छोटय़ा जागांमध्येही साठत असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या डासांची मोठय़ा प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. पालिकेकडील नोंदींनुसार सप्टेंबरमध्ये गुरुवापर्यंत पुण्यात डेंग्यूसदृश आजाराचे ५८२ रुग्ण सापडले असून त्यातील १४७ रुग्णांची चाचण्यांअंती निश्चित डेंग्यूरुग्ण म्हणून नोंद करण्यात आली आहे. चिकुनगुनियाचेही २२९ रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले आहेत.
pun01

डासांची उत्पत्ती शोधणे आणि या आजारांविषयी जनजागृती करणे या कामांसाठी पालिकेकडे ५२ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता होती. आता मात्र ३०० कंत्राटी कर्मचारी घेतले असून पालिकेचेही २०० ते २५० कर्मचारी उपलब्ध असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पण आजारांचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. पुण्यातील लोकसंख्येची घनता पाहता पालिकेच्या पायाभूत सुविधा तोकडय़ा पडत असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नोंदवले. ‘कोंढवे, शिवणे, धावडे अशा पुण्याच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या भागातील गावे अजूनही ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. पण या ठिकाणची लोकसंख्या मात्र ५० ते ६० हजारांवर गेली आहे. या ठिकाणी पालिका पोहोचत नाही,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.