महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुध्द केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शह-काटशहाचे व कुरघोडीचे राजकारण रंगले असतानाच पिंपरीतील ‘घरकुल’ प्रकल्पातील सदनिका वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने हे तीनही नेते रविवारी पिंपरीत एकाच व्यासपीठावर येत आहेत. राज्यभरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निर्णयाच्या पातळीवर असताना व तापलेल्या वातावरणात दोन्ही काँग्रेसमध्ये श्रेयासाठी चढाओढ होत असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व वाढले आहे.
चिखलीतील पेठ क्रमांक १७ व १९ येथील घरकुल प्रकल्पातील १००८ सदनिकांचे वाटप रविवारी (२२ डिसेंबर) सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. शरद पवार व केंद्रीय गृहनिर्माणमंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून मुख्यमंत्री अध्यक्षस्थानी राहणार आहेत. अजित पवार प्रमुख उपस्थितीत असून महापौर स्वागताध्यक्ष आहेत. महापौर मोहिनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेविका वैशाली काळभोर आदी उपस्थित होते. याबाबतची सोडत उद्या (मंगळवारी) रामकृष्ण मोरे नाटय़गृहात काढण्यात येणार आहे.
अजितदादांच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेला ‘घरकुल’ प्रकल्प प्रारंभापासून वादात आहे. दीड लाखात घर देण्याची घोषणा राष्ट्रवादीला महागात पडली. तीन लाख ७६ हजार रुपये लाभार्थी हिस्सा ठरवण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. १३ हजार २५० घरांसाठी असलेल्या या योजनेतील दुसरा टप्पा जागा उपलब्ध नसल्याचे सांगत गुंडाळण्यात आला. २००७ मध्ये घोषणा होऊनही घरांच्या चाव्या देण्यासाठी सहा वर्षांनंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुहूर्त मिळाला आहे. चिखलीतील घरकुलच्या जागेसाठी प्राधिकरणाने ११४ कोटी रुपये मागितले होते. मात्र, सार्वजनिक हिताचे काम असल्याने सवलतीच्या दरात २७ कोटींवर तोडगा काढण्यात आला. प्रदूषण मंडळाची परवानगी मिळत नव्हती, ती काही सदनिकांपुरतीच मिळाली आहे, असे अनेक अडथळे पार पाडल्यानंतर आतापर्यंत ३५६ कोटी रुपये खर्च झालेल्या या प्रकल्पातील १००८ घरांचे वाटप पहिल्या टप्प्यात होणार आहे. उर्वरित घरांचे वाटप टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे सांगण्यात आले.