जुन्या टायर आणि चिंध्यांपासून बनवलेल्या खुच्र्या, वाया गेलेल्या बाटल्यांपासून बनवलेले शोभेचे झाड, नैसर्गिक रंग वापरलेले कपडे आणि अगदी जैवविविधता जपून केलेल्या कॉफीच्या शेतीत पिकवलेली कॉफीही..! या सर्व गोष्टी किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या ‘इको बझार’मध्ये पाहायला मिळत आहेत.
घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सभागृह येथे भरलेल्या या प्रदर्शनाचे ‘थरमॅक्स’च्या माजी अध्यक्ष मेहेर पदमजी आणि महोत्सवाच्या निमंत्रक आरती किलरेस्कर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. फर्निचर, कपडे आणि आहार अशा तीन प्रमुख विभागात हे प्रदर्शन विभागले असून त्यात वस्तूंची विक्रीही केली जात आहे. प्रदर्शनाच्या व्यवस्थापक जुई तावडे व सुप्रिया गोटुरकर यांनी याविषयी माहिती दिली. जुन्या वा टाकून देण्याजोग्या वस्तूंचा वापर करून बनवलेल्या लँप शेड्स, टायर, चिंध्या, वेत व बांबूपासून बनवलेल्या खुच्र्या, मोढे आणि घरात टांगायचे झोके, जुन्या प्लायवुडपासून बनवलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. कीटकनाशके न वापरता पिकवलेल्या कापसापासून तयार केलेले कापड, नैसर्गिक रंग या गोष्टीही पाहता येणार आहेत. भारत विकास ग्रुपतर्फे या प्रदर्शनात प्लास्टिकपासून इंधन बनवण्याचे लहान मशीन बसवण्यात आले असून हे इंधन नेमके कसे बनवले जाते याची माहिती नागरिकांना घेता येणार आहे.
आपल्या घरातील टाकून द्यायचे प्लास्टिक जमा करण्यासाठीही प्रदर्शनात वेगळी सोय करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. हातसडीचा भात, नाचणी, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या प्रदर्शनात विक्रीसाठी असून प्राणीजन्य पदार्थ न वापरता केलेली (वेगन) सँडविच, सेंद्रिय चहा आणि कॉफीही ठेवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
१२ तारखेपर्यंत दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य सुरू राहणार असून ३ ते ५ या वेळात हातकागद बनवणे, टाकाऊ वस्तूंपासून नव्या वस्तूंचे उत्पादन, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.