शंभर पैकी २५ गुण मिळाले तरी आम्हाला पास करा.. एटीकेटीसाठी विषयांची संख्या वाढवा.. नापास असतानाही पुढील वर्गात प्रवेश द्या.. अशा मागण्यांसाठी पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी झुंडशाही सुरू केली आहे. नापास झाल्यामुळे आमचे एक वर्ष फुकट जाते अशी सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात हे विद्यार्थी असून, त्यांच्या मागण्यांचा राजकीय फायदा उठवण्यासाठी विविध संघटनाही सरसावल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरू कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली.
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या किंवा अंतिम वर्षांत प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी विद्यापीठात जमले होते. अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्षांत विद्यार्थी ज्या विषयात नापास झाला असेल, त्या विषयात तिसऱ्या वर्षांतही तो विद्यार्थी पास होऊ शकला नाही, तर त्या विद्यार्थ्यांला चौथ्या वर्षांसाठी प्रवेश दिला जात नाही. त्या पाश्र्वभूमीवर आता झुंडशाही करून विद्यापीठाचे नियमच बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या वर्षांतील विषयांमध्ये अनुत्तीर्ण असतानाही चौथ्या वर्षांत आणि तिसऱ्या वर्षांत अनुत्तीर्ण असतानाही अंतिम वर्षांत प्रवेश देण्यात यावा, म्हणजेच ‘कॅरी ऑन’ देण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यापीठ पुढच्या वर्गात प्रवेश देत नसल्यामुळे ‘आमचे एक वर्ष वाया जाते’ असा मुद्दा विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.
त्यांनी सोमवारी कुलगुरू वासुदेव गाडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांची ही मागणी पूर्ण होणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केल्यानंतर एखाद्या भाजीबाजारात चालावी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून मागण्यांची घासाघीस केली जात आहे. नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलणे शक्य नसेल, तर उत्तीर्ण होण्यासाठीची किमान गुणांची अटच बदलून टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शंभर पैकी पंचवीसच गुण मिळाले, तरीही उत्तीर्ण करण्यात यावे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एखाद दोन विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत देऊन पुढील वर्गात प्रवेश दिला जातो. तीन विषयांपर्यंत एटीकेटी मिळू शकते. मात्र, तीन विषयांऐवजी पाच विषयांपर्यंत नापास झाल्यास एटीकेटी देण्यात यावी, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेले चार दिवस विद्यापीठात जमणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा राजकीय फायदा उठवण्यासाठी संघटना सरसावल्या आहेत. आता विविध पक्षांशी जोडल्या गेलेल्या विद्यार्थी आणि युवक संघटनांची विद्यार्थ्यांच्या दंगेखोरीला साथ मिळाली आहे.