पुण्यातील मंडळे, संस्था आणि पाणपोई यांचे घट्ट समीकरण होते. गुढीपाडव्यापासून चौकाचौकात मंडळांच्या पाणपोया सुरू व्हायच्या आणि त्या पावसाळ्यापर्यंत चालायच्या. या पाणपोयांच्या उद्घाटनांचे मोठे कार्यक्रमही व्हायचे. पाणपोयांची संख्या आता कमी झाली असली, तरी उन्हाळ्यातील पांथस्थांच्या सेवेला एक नवा आयाम जोडला गेला आहे. तो आयाम आहे ‘ताकपोई’चा..
 उन्हाळ्याची चाहूल लागली की चौकाचौकात मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाणपोया सुरू केल्या जात. छोटासा तट्टय़ाचा किंवा कापडी मंडप, त्यात लाल कापड बांधलेले दोन-तीन रांजण, रांजणांवर लाकडी झाकणे आणि प्लॅस्टिकचे ग्लास ही पाणपोईची खूण. पाणपोया आता कमी झाल्या आहेत. मात्र मध्य पुण्यात सुरू असलेले ताकवाटपाचे उपक्रम हा पाणपोईचाच पुढचा भाग ठरला आहे.

मंडई परिसरातील बदामी हौद चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले ‘लक्ष्मी’ हे मंगलकार्यासाठी लागणारे साहित्य पुरविणारे दुकान आहे. या व्यवसायाचे मालक बच्चूभाई भायाणी आणि त्यांची पत्नी आशा यांनी पंधरा वर्षांपूवी उन्हाळ्यात ताकवाटपाचा उपक्रम स्वेच्छेने सुरू केला. कोणतीही अपेक्षा न ठेवता भायाणी हे स्वखर्चातून दर उन्हाळ्यात हा उपक्रम राबवित राहिले. सन २०१२ मध्ये बच्चूभाईंचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी आशा आणि कुटुंबीयांनी मिळून ताकवाटपाचा हा उपक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवला आहे. भायाणी कुटुंबीयांतर्फे स्वखर्चाने हा उपक्रम राबवला जातो.
या उपक्रमाची माहिती देताना दुकानाचे व्यवस्थापक नितीन पुरोहित ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, उन्हाळ्यात ताकवाटपाचा उपक्रम राबविण्यास पंधरा वर्षांपूर्वी सुरुवात झाली. बच्चूभाई आणि त्यांची पत्नी आशा हे उन्हाळ्यात दुपारी घरी जेवण करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे काही मुले गार पाणी मागण्यासाठी आली. तेव्हा बच्चूभाईंच्या मनात आले की उन्हाळ्यात थंड ताकाचे वाटप केले तर? आणि ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. गेली पंधरा वर्ष उन्हाळ्यात ताकवाटपाचा उपक्रम सुरू आहे. रंगपंचमीच्या दिवसापासून भायाणी कुटुंबीयांतर्फे ताकवाटपाचा उपक्रम सुरू होतो आणि पहिला पाऊस पडेपर्यंत तो दररोज चालतो. सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ताकवाटप केले जाते. दररोज आठ ते दहा लिटर दूध विकत घेऊन त्याचे दही लावून ताक केले जाते.
गुरुवार पेठेतील ‘ताकघर’
मध्य पुण्यातील फुलवाला चौक येथे श्री गोडीजी पाश्र्वनाथजी टेम्पल ट्रस्ट आणि जैन अॅलर्ट ग्रुप यांच्यातर्फेही ताकवाटप करण्यात येते. जैन मंदिराच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या छोटेखानी मांडवात ‘ताकघर’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी ताकवाटपाला सुरुवात झाल्यानंतर गल्लीबोळातून वाट काढत जाणारे पीएमपीचे चालक आणि वाहक देखील आवर्जुन आमच्याकडून ताकाचा ग्लास मागवून घेतात. व्यापारी पेठेतील कामगार वर्ग असो वा मोठा व्यापारी असो, सर्वजण येथे ताक पिण्यासाठी येतात, असे जैन अॅलर्ट ग्रुपचे चिराग दोशी यांनी सांगितले.
हा उपक्रम राबविण्यासाठी लिबर्टी स्टोअर्सने सहकार्य केले आहे. दररोज दीड हजार जणांना ताक वाटप केले जाते. गेली पाच वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कात्रज येथील दूग्धव्यावसायिक भिलारे यांच्याकडून अडीचशे ते तीनशे लिटर ताक मागविण्यात येते. गुढीपाडव्यापासून ते आठ जूनपर्यंत ताकवाटपाचा उपक्रम केला जातो. हे ताकघर तीनपर्यंत खुले असते.