पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांच्या आठवडय़ाचा शेवट सुखावणाऱ्या रिमझिम पावसाने झाला. शनिवारी आणि रविवारीही शहराच्या अनेक भागांत अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या. या आठवडय़ात मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात गेला आठवडाभर दररोज पावसाळी हवामान आहे. परंतु पावसाळा सुरू झाल्यासारखा पाऊस काही झाला नव्हता. शहरातील पावसाची प्रतीक्षा शनिवार व रविवारच्या सरींनी संपवली. शनिवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरींना सुरुवात झाली होती, रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस पडत राहिला.
‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या आकडेवारीनुसार रविवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत पुण्यात १.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. लोहगावमध्येही हलक्या पावसाची नोंद झाली. वेधशाळेने पुढील सहा दिवसांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्व दिवस अधूनमधून पावसाची शक्यता आहे. ‘सोमवारी थांबून थांबून हलका पाऊस पडेल, तर २८ व २९ जूनला अधूनमधून जोराच्या पावसाची शक्यता आहे. ३० तारखेपासून पावसाचा जोर वाढणार असून, २ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दोन दिवसांत जोर वाढणार
मुंबईसह ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्य़ांत पावसाचा जोर वाढला असून कोकणातील संततधार सुरूच आहे. उर्वरित महाराष्ट्राकडे पाठ फिरवणारा पाऊस दोन दिवसांत पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे.मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात मंगळवारपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज आहे.
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती असून रविवारी भारताच्या वायव्य भागात गुजरात व राजस्थानपर्यंत पाऊस पोहोचला आहे. सध्या देशात सर्वाधिक पाऊस कोकण किनारपट्टीवर पडत आहे.
रविवारी सकाळच्या नोंदीनुसार दिवसातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या पहिल्या सहा क्रमांकांमध्ये कोकणपट्टीतील पाच ठिकाणांचा समावेश आहे. डहाणू येथे २५० मिमी, अलिबागला १८२ मिमी, हर्णेला १७४ मिमी, कुलाबा येथे १२२, भिरा येथे ११० तर सांताक्रूझ येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय उरण (१७४ मिमी), गुहागर (१७० मिमी), पालघर (१४६ मिमी), पेण (१४० मिमी), श्रीवर्धन व दापोली (१३० मिमी), रत्नागिरी व पनवेल (१२० मिमी), सांताक्रूझ (८५ मिमी) येथेही जोरदार सरी आल्या. रविवापर्यंत मुंबईतील सांताक्रूझ येथे ४६५ मिमी, तर कुलाबा येथे ३८९ मिमी पावसाची नोंद झाली.