राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य प्रा. मल्लिक यांचे प्रतिपादन
आधुनिक काळात तंत्रज्ञान हे लष्करी डावपेचांबरोबरच विदेशनीतीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अर्थात, तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. त्यातून निर्माण होणारी सायबर हल्ल्यांसारखी आव्हानेही मोठी आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान सिद्धतेकडे डोळसपणे पाहायला हवे, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य प्रा. अमिताव मल्लिकयांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या वतीने ‘यशदा’ येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रा. मल्लिक यांच्या ‘रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन इंटरनॅशनल अफेअर्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभही या वेळी पार पडला. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माधव मंगलमूर्ती, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.
‘‘देशाच्या संरक्षणसिद्धतेच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्टय़ा पुरेसे सबळ होण्यासाठी भारताने वेळोवेळी अमेरिका आणि सोव्हियत युनियनशी लष्करी पातळीवरील संबंध प्रस्थापित केले आहेत. देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची भूमिका त्यात महत्त्वाची ठरली होती. सोव्हियत युनियनचा पाडाव झाल्यानंतर भारत-अमेरिका संबंध वाढविण्याची गरज त्यांनी अचूक हेरली होती. त्यातूनच ‘नेक्स्ट स्टेप्स इन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ यासारख्या विदेशनीती आपल्याकडे रुजू झाल्या आणि सत्तासमीकरणे बदलली.’’
‘‘विकसनशील देश असल्यामुळे आजही अनेकदा आधुनिक तंत्रज्ञानात आपण मागे असण्याचा फटका आपल्याला बसतो हे नाकारता येणार नाही. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान दरवेळी आपल्याला उपलब्ध होतेच असे नाही. नवे तंत्रज्ञान इतर देशांकडे पोचू नये, असा अनेक विकसित देशांचा प्रयत्न असतो. आपण प्रगती कशी करतो, हे महत्त्वाचे ठरते,’’ असे मत डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केले.