वडगाव धायरी येथील जमिनीच्या मालकी वादाबाबत निकाल विरोधात दिल्याचा राग मनात धरून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील आणि कारकून मििलद पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न सोमवारी सायंकाळी करण्यात आला. शाई फेकणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ झाला. कृष्णा मधुकर गायकवाड, प्रभाकर मारुती कोंढाळकर, विनोद सुभाष जवळकर आणि रवींद्र दामोदर लायगुडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. लायगुडे आपल्या तीन साथीदारांसह शिवीगाळ करीत पाटील यांच्या कार्यालयामध्ये शिरले. त्यांच्यासमवेत असलेल्या एका महिलेने काळ्या शाईची बाटली काढून त्यांच्या हातामध्ये दिली. या बाटलीतील शाई त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. या चौघांनी सुनावणीच्या नोंदीसाठी बसलेल्या मििलद पाटील यांच्या अंगावर शाई फेकत धक्काबुक्की केली.