पूर्ण जागा देण्यास पाणीपुरवठा विभागाचा नकार; महामेट्रोच्या मार्गात अडथळे

तब्बल आठ वर्षांनंतर मेट्रो मार्गिकेच्या पुण्यातील कामाला प्रारंभ झाला असला, तरी महामेट्रोला स्टेशन आणि अन्य कारणांसाठी आवश्यक असलेल्या जागांचा ताबा मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता महामेट्रोकडून स्वारगेट परिसरात उभारण्यात येणारे ट्रान्स्पोर्ट हबही अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामेट्रोकडून या जागेची महापालिकेकडे मागणी करण्यात आली असली, तरी तेथे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साठवणूक टाक्यांची उभारणी होणार असल्यामुळे संपूर्ण जागा देता येणार नाही, अशी भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. त्यामुळे कमी जागेत ट्रान्स्पोर्ट हब उभारता येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वारगेट-पिंपरी या मेट्रो मार्गिकेसाठी स्वारगेट परिसरातील जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट महिन्यात दिले होते. महामेट्रोकडून हे काम हाती घेण्यात येणार आहे. या ट्रान्स्पोर्ट हबचा प्राथमिक आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखडय़ाअंतर्गत (इंटिग्रेटेड मल्टिमोडय़ुल ट्रान्सपोर्ट हब) महामेट्रोकडून जेधे चौकात हे काम प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) या संस्था मिळून हे काम एकत्रित करणार असल्या तरी महामेट्रोची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. समन्वयकाची भूमिका महाराष्ट्र रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशनला (महामेट्रो) बजावावी लागणार आहे.

स्वारगेट येथील सहा हेक्टर जागेची महामेट्रोकडून महापालिकेकडे मागणी करण्यात येणार आहे. तेथे पीएमपी, एसटी आणि मेट्रो यांचे एकत्रित ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे. त्यामध्ये मेट्रोचे स्टेशनही प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर जागा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. ही जागा महापालिकेकडून महामेट्रोला मिळेल, असा दावा महामेट्रोचे अधिकारी करीत होते. मात्र महामेट्रोने मागणी केलेल्या जागेवर समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठीची जागाही निश्चित झाली आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आला. मात्र पूर्ण जागा देण्यास पाणीपुरवठा विभागाने नकार दिला आहे. सहा हेक्टर जागेपैकी दोन हेक्टरच्या आसपास जागा देण्यास पाणीपुरवठा विभागाने तयारी दर्शविली आहे. या जागेतच पाणीपुरवठा विभागाचे केंद्र असून काही शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थानेही आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून पाणीपुरवठा विभागाच्या अभिप्रायानुसार प्रस्ताव तयार करून तो मुख्य सभेला सादर करणार आहे. मुख्य सभेच्या निर्णयावरच ट्रान्सपोर्ट हबच्या उभारणीचा निर्णय अवलंबून आहे.

जागांबाबत तिढा

स्वारगेट-पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले असून येत्या काही दिवसांमध्ये वनाझ ते रामवाडी या दुसऱ्या मार्गिकेच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मेट्रो स्थानकासाठी शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा मिळविण्यासाठी महामेट्रो प्रयत्नशील आहे. तसेच कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील जागेपैकी काही जागाही महामेट्रोकडून मागण्यात आली आहे. कृषी महाविद्यालयाच्या जागेपैकी काही जागा आणि शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा पीएमआरडीएने हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी मागणी केली आहे. जिल्हा न्यायालयानेही कृषी महाविद्यालयाच्या जागेपैकी काही जागा मागितली आहे. तसे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. कृषी महाविद्यालय आणि शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा महामेट्रोला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले, तरी या जागांबाबतही तिढा निर्माण झाला आहे.