उन्हाळा आणि ‘कोकणातला हापूस आंबा’ असे पुणेकरांसाठीचे समीकरण असले तरी आंबा उत्पादनाचे प्रत्यक्षातील चित्र मात्र गेल्या काही वर्षांत चांगलेच बदलले आहे. उन्हाळा आणि ‘कर्नाटकचा हापूस’ असे चित्र आता पुण्यातील बाजारात दिसत असून कोकणातल्या हापूसची रोज साडेचार ते पाच हजार पेटय़ा तर कर्नाटक हापूसच्या १२ ते १५ हजार पेटय़ांची आवक गुलटेकडी येथील घाऊक बाजारात सध्या रोज सुरू आहे. असेच चित्र संपूर्ण हंगामात राहणार असल्याचाही जाणकारांचा अंदाज आहे.
घाऊक बाजाराला आता अक्षयतृतीयेचे वेध लागले आहेत. अक्षयतृतीयेसाठी आंब्याला मोठी मागणी राहते. त्यामुळे आंब्याची आवकही वाढली आहे. घाऊक बाजाराशिवाय पुण्यात थेट कोकणतून आंबे मागवून त्यांची विक्री करणारेही शेकडो घरगुती विक्रेते असून त्यांच्याकडे रोज सरासरी दोन हजार पेटय़ांची आवक कोकणातून सुरू आहे. यंदाच्या हंगामात कोकणात आलेला मोहोर पाहून किमान ८० टक्के आंबा उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. मात्र मोहोरानंतर फलधारणा होण्याच्या काळातील प्रतिकूल हवामान आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगलेच घटल्याची माहिती मार्केटयार्ड मधील आंब्याचे एक प्रमुख विक्रेते नितीन कुंजीर यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कर्नाटकमधून आंब्यांची जी आवक होत होती त्यात कर्नाटक हापूसच्या पेटय़ांचे प्रमाण २० टक्के आणि पायरीच्या करंडय़ांचे प्रमाण ८० टक्के असायचे. हे चित्र सन २००४-०५ पासून बदलत गेले आणि आता कर्नाटकातून येणाऱ्या हापूसच्या पेटय़ांचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत गेले आहे. हापूसची मागणी लक्षात घेऊन तिकडच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत प्रयत्नपूर्वक हापूसचे उत्पादन वाढवले आहे. परिणामी पुण्यात आता कर्नाटकचा आंबा अधिक आणि रत्नागिरीचा त्या तुलनेत कमी असे चित्र दर हंगामात दिसत आहे. हापूसच्या उत्पादनाबरोबरच आंबा प्रक्रिया उद्योगही कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात सुरू झाला असून पुण्यात होणारी कर्नाटक हापूसची आवक प्रामुख्याने तुमकूर, टॅमगुंडलू, चित्रदुर्ग, भद्रावती येथील असल्याची माहिती कुंजीर यांनी दिली.
बाजारात यंदाही कर्नाटक हापूसचीच आवक अधिक प्रमाणात आहे. आंबा तोडणीची आणि पेटी भरण्याची पद्धत यात कोकणातील शेतकरी, बागायतदार सरस असल्याने तसेच स्वाद, रंग, चव यातही कोकणचा आंबा उजवा असल्यामुळे त्याला कर्नाटकच्या तुलनेत दरही अधिक मिळत आहे.

यंदा ‘कार्बाइड’चा वापर कमी?
‘कॅल्शियम कार्बाइड’च्या पुडय़ा टाकून झटपट आंबे पिकवण्यास बंदी आहे. पांढऱ्या पावडरीसारखे दिसणारे कॅल्शियम कार्बाइड सहजरीतीने व स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे त्याच्या साहाय्याने आंबे पिकवले जाणे ही नेहमीच ग्राहकांच्या चिंतेची बाब असते. शिवाय कार्बाइडचा आंबा कुठला ते सामान्यांना ओळखणेही शक्य होत नाही. यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असल्यामुळे आंब्यांसाठी कार्बाइड वापरण्याची वेळच येणार नाही, असे आंबा विक्रेत्यांकडून सांगितले जात होते. अन्न व औषध विभागानेही नुकत्याच केलेल्या विक्रेत्यांच्या तपासण्यांमध्ये कार्बाइड आढळलेले नाही. अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, ‘‘मार्केटयार्डमध्ये आठ ठिकाणी आणि पिंपरी- चिंचवडमध्ये काही ठिकाणी आंबा विक्रीच्या ठिकाणी अचानक तपासण्या करण्यात आल्या. परंतु एकाही ठिकाणी कॅल्शियम कार्बाइड मिळालेले नाही. गेली दोन वर्षे प्रशासनाने कार्बाइडबाबत धडक कारवाया केल्या होत्या. यंदा आमच्या आवाहनाला आंबा विक्रेत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांना कार्बाइड विरहित आंबा मिळण्याची शक्यता आहे.’’ कार्बाइडची पावडर लावून पिकवलेल्या आंब्याचा वरचा भाग पिवळा व गोड होतो, पण अनेकदा आंबा कोईकडे कच्चाच राहतो. अशा प्रकारे पिकवलेल्या फळात नैसर्गिक गुणवत्ता नसते, तसेच अशी फळे खाल्ल्यामुळे आरोग्यावरही दुष्परिणाम संभवतात.

अभ्यासगट स्थापनेची आवश्यकता
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधील आंब्याचे उत्पादन गेल्या तीन वर्षांत सातत्याने काही ना काही कारणाने कमी झाले आहे. मार्केटयार्डमध्ये आलेल्या आंबा उत्पादकांशी चर्चा करताना त्यांनी अशी मागणी केली, की उत्पादनात येत असलेल्या घटीबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या विषयावर दापोली कृषी विद्यापीठाचा एखादा अभ्यासगट तातडीने स्थापन करावा आणि या अभ्यासगटाने शेतकऱ्यांना, आंबा उत्पादकांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उस, द्राक्ष, डाळिंब आदींवर संशोधन करणारी केंद्र आणि संस्था प. महाराष्ट्रात स्थापन झाल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. आंबा उत्पादकांनाही तशाच मार्गदर्शनाची गरज असल्याची मागणी केली जात आहे.