आळंदीतील कार्तिकी यात्रेत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२० वा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत आहे. ३ ते ११ डिसेंबर या काळात राज्यभरातून श्रींच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या तसेच मंदिर आणि परिसर सुरक्षेस आळंदी देवस्थानने प्राधान्य दिले असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, विश्वस्त डॉ. अभय टिळक, डॉ. नरेंद्र वैद्य यांनी आळंदी देवस्थानच्या प्रथा-परंपरा, श्रींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्तिकी यात्रेतील तयारी सुरू करण्यात आली आहे. यात श्रींच्या सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन, श्रींचे भाविक-नागरिक यांना कमी वेळात सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मिश्र दर्शनबारी, महापूजा दर्शनबारी, नित्य नमितिक मंदिरातील दर्शनबारी लावण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्षी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून पत्रे लावून बंदिस्त दर्शनबारीचे काम सुरू करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिस बंदोबस्त, भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिरात देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात्रा काळात भाविक-नागरिकांची गरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे नियोजन प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, विश्वस्त डॉ. अभय टिळक, डॉ. नरेंद्र वैद्य यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सर्व कामगार, सेवक यांच्या मदतीने सुरू आहे.
मंदिरात भाविकांना पिण्याचे पाणी, लाडू प्रसाद, संत साहित्य ग्रंथविक्री आदीसह स्वच्छतेची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासह पुणे जिल्हा पोलिस, महसूल प्रशासन, आरोग्य सेवा प्रशासन आणि आळंदी पालिकेने केलेल्या सूचनेप्रमाणे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय भाविकांसाठी इंद्रायणी नदी घाटावर पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे बसविण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.