‘प्रभात’मध्ये बुधवारी गेलेल्यांचे लक्ष चित्रपटाकडे होतेच, त्याचबरोबर चित्रपटगृहाकडेसुद्धा! चित्रपटगृहाची इमारत, ‘ किबे लक्ष्मी थिएटर’ची अक्षरे, त्यावर तुतारी वाजवणारी महिला, बाल्कनीत जाण्यासाठीचा जिना, त्याचे लाकडी कठडे.. प्रत्येक गोष्ट न्याहाळली जात होती. कारण या चित्रपटगृहाचा गुरूवारी असलेला अखेरचा दिवस!
ऐंशी वर्षांच्या आठवणी जपलेल्या प्रभात चित्रपटगृहाचा गुरूवारी (२५ डिसेंबर २०१४) अखेरचा दिवस. त्यामुळे बुधवारी आलेले अनेक जण चित्रपटाबरोबरच चित्रपटगृह न्यायाहाळण्यास उत्सुक होते. प्रत्येक आठवण डोळ्यात सामावून घेत होते. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून अनेक गोष्टी टिपत होते. यामध्ये महिला-पुरूष होतेच. तरुणांबरोबरच वयस्कर नागरिकसुद्धा! तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलत होते- वाहनतळ वाले, खाद्य पदार्थाचे विक्रेते, तिकिट खिडकीतील कर्मचारी, बॅटरी घेऊन प्रेक्षकांना सीटपर्यंत रस्ता दाखवणारे डोअर कीपर. अशा सर्वाशी बोलत होते. त्यांच्याकडून चित्रपटगृहाच्या आठवणी ऐकत होते.
मराठी चित्रपटांसाठीचे पुण्यातील हक्काचे ठिकाण म्हणजे- प्रभात. १९३४ सालापासून ते सुरू आहे. तिथे आतापर्यंत १३०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सलग अडीच वर्षे चाललेला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट, गेली ३८ वर्षे मराठी चित्रपटांचेच खेळ, बालगंधर्व यांचा अभिनयाचा साक्षीदार, व्ही. शांताराम-फत्तेलाल या दिग्गजांचा संबंध.. अशा अनेक आठवणी प्रभात चित्रपटगृहाने गेल्या ८० वर्षांच्या काळात जोपासल्या आहेत. करार संपल्यामुळे आता ेह चित्रपटगृह मूळ मालक किबे यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे गुरूवारनंतर (२५ डिसेंबर २०१४) ते चित्रपटांसाठी बंद असेल.
प्रभात फिल्म कंपनीने २१ सप्टेंबर १९३४ रोजी हे चित्रपटगृह भाडेपट्टय़ावर घेतले. तेव्हापासून आतापर्यंतच्या ८० वर्षांच्या काळात या चित्रपटगृहाने अनेक आठवणी जपल्या आहेत. ते ‘किबे लक्ष्मी थिएटर’ या नावानेही ओळखले जाते. ‘प्रभात’ मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पहिला सिनेमा होता इंग्रजी, म्युझिकल कॉमेडी या प्रकारातील. नाव होते- ‘लव्ह मी टू नाइट.’ पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला- अमृतमंथन. ८० वर्षांच्या काळात तिन्ही भाषेतील एकूण १३०० चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शेवटचा दीर्घ काळ चाललेला हिंदी चित्रपटच होता- जितेंद्र-जयाप्रदा यांचा ‘तोहफा’. गेल्या ३८ वर्षांत मात्र नाममात्र अपवाद वगळता सर्व मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट आहे- माहेरची साडी. तो सलग तब्बल १२८ आठवडे चालला. याशिवाय सुवर्ण महोत्सवी (५० आठवडे) आणि रौप्यमहोत्सवी (२५ आठवडे) अनेक चित्रपट चालले. प्रभात हे चित्रपटगृह आणि नाटय़गृह म्हणूनही वापरले जायचे. तेथे बालगंधर्व यांचेही प्रयोग झाले आहेत.

आमचं दुसरं घर
‘‘गेली पन्नास वर्षे इथं नोकरी करत आहे. निवृत्त झाल्यावरही काम मिळाल्यानं ‘प्रभात’वर येत राहिलो.   मराठी चित्रपट, कलाकार, प्रेक्षक या साऱ्यांबरोबरच जगता-जगता आमचं आयुष्य पण बदललं. या एवढय़ा वर्षांत ‘प्रभात’ आमचं दुसरं घरच झालं. आता उद्यापासून इथं यायचं नाही, ही कल्पना सुद्धा सहन होत नाही.’’
– बबन किसन लोणारे, कर्मचारी, प्रभात
————-
‘‘मराठी चित्रपट आणि प्रभात हे अगदी सख्खं नातं. इथं आलं, की केवळ तो चित्रपटच नाही तर मराठी विश्वात आल्यासारखं वाटतं. प्रभातची ती ऐतिहासिक वास्तू, आतील रचना- मांडणी, शोकेसमधून नकळतपणे झळकणारा मराठी चित्रपटांचा, प्रभातचा इतिहास. हे सारं वेगळ्य़ा जगात घेऊन जातं. एरवीदेखील कधीही आलो, की हे कौतुकानं पाहणं व्हायचं. पण आज हे सारं पुन्हा पाहताना उद्या ते असणार नाही याचीच काळजी मनाला पोखरत होती.’’
– एक प्रेक्षक, प्रभात चित्रपटगृह