– ‘पाच लाखांत घर’ प्रकरण
– वीस हजार नागरिकांकडून नोंदणी
‘पाच लाखांत घर’ प्रकरणामध्ये मॅपल कंपनीच्या कागदपत्रांची छाननी पोलिसांनी सुरू केली असून, तूर्तास कंपनीची बँक खाती सील करण्यात आली आहेत. कंपनीला त्यांच्या जमिनी विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाहीत. कागदपत्रांच्या छाननीनंतर पोलिसांकडून संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. दरम्यान, मॅपलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयात झाडाझडती सुरू करून कर्मचाऱ्यांची चौकशी केली. संचालकांनाही चौकशीला हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कंपनीच्या प्रकल्पासाठी वीस हजार नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
पंतप्रधान अवास योजनेअंतर्गत ‘पाच लाखांत घर’ अशी जाहिरात करून त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे छायाचित्र वापरल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मॅपलचे संचालक सचिन अशोक अगरवाल, नवीन अशोक अगरवाल आणि विक्री व्यवस्थापक प्रियांका अगरवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणावर बापट म्हणाले की, या प्रकरणातील तपासात पोलीस हलगर्जीपणा करणार नाहीत. कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी होत असून, सील करण्यात आलेल्या बँकांच्या खात्यामध्ये एकात दोन कोटी, तर दुसऱ्या खात्यात सहा लाख रुपये आहेत. त्यांना जमिनी विकता येणार नाहीत किंवा हस्तांतरितही करता येणार नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मी कंपनीच्या जाहिराती पाहिल्या आहेत. कोणत्याही परवानग्या न घेता पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र वापरता येत नाहीत. परवानगी न घेता किंवा कोणतीही चर्चा न करता, अशी छायाचित्र वापरणे चुकीचे आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. त्यानुसार मॅपल ग्रुपच्या शिवाजीनगर परिसरातील कार्यालयांची पोलिसांकडून बुधवारी पाहणी करण्यात आली. तसेच तपासाच्या अनुषंगाने तेथील कर्मचारी आणि अगरवाल कु टुंबीयांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोपी सचिन, नवीन आणि प्रियांका हे या गुन्ह्य़ात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाशी पत्रव्यवहार केल्याचे समजते. मॅपल ग्रुपच्या पाच लाखांत घर या योजनेत वीस हजार जणांनी नोंदणी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.
 नोंदणीचे पैसे परत देणे सुरू
मॅपल ग्रुपने ‘पाच लाखांत घर’ योजनेसाठी परत न देण्याच्या अटीवर घेतलेले नोंदणीचे प्रत्येकी १४४५ रुपये नागरिकांना परत देण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच शासनाने दिले होते. त्यानुसार हे पैसे परत करण्यात येत असल्याची माहिती ग्रुपने त्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून दिली आहे. संपर्कासाठी ८३८००४५०६३/ ७७२००८०९४१ हे क्रमांकही देण्यात आले आहेत.
सचिन अगरवाल यांना ओळखत नाही- बापट
मॅपल ग्रुपशी काहीही संबंध नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुण्यात एका कार्यक्रमामध्ये बापट व मॅपलचे संचालक सचिन अगरवाल एकाच व्यासपीठावर असल्याचे छायाचित्र पुढे आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत स्पष्टीकरण देताना बापट म्हणाले की, सचिन अगरवालसोबत माझे छायाचित्र असले, तरी मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही.
बापट यांच्याविरुद्ध मनसेचे आंदोलन
पालकमंत्री गिरीश बापट व मॅपलचे संचालक सचिन अगरवाल मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात होते. तो संपल्यानंतर पोलीस व पालकमंत्र्यांच्या समोर अगरवाल पळून गेले. त्यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली असून, नागरिकांना फसविणाऱ्याला सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे नेते अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.