पुण्यातील दापोडी येथील महिलेने पोटच्या मुलीला नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली. बुधवारी पुण्यात १० दिवसांच्या बाळाचं अपहरण झाल्यानं खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणाने वेगळे वळण घेतलं. खडकी पोलिसांत बाळाला पळवून नेल्याची तक्रार दाखल करणाऱ्या आईनंच आपल्या मुलीला नदीत फेकल्याचं तपासातून स्पष्ट झालं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोडीच्या रेश्मा शेख या महिलेनं बुधवारी बाळाचं अपहरण झाल्याचा कांगावा करत आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत निर्दयी आईचे भिंग फोडले. बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवताना महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसांना हा बनाव असल्याची शंका आली. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घडलेल्या घटनेपासून पन्नास मीटर अंतरावर असलेल्या दुकानासमोर पोटच्या बाळासाठी रेश्मा मदतीची याचना करत असलेला सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. यामुळे रेश्माचा बनाव उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. निर्दयी आईने मुळा नदीत बाळाला फेकून दिले. त्यानंतर तिने बाळाला पळवून नेल्याचा कांगावा केल्याचे स्पष्ट झाले.

बाळाला नदीत फेकल्याचे समोर आल्यानंतर अग्निशमन दलाने बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळाचा शोध अद्यापही लागलेला नाही. रेश्मा शेखने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस शोध घेत आहेत. रेश्माने आत्तापर्यंत चार बाळांना जन्म दिला. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी एका मुलीचं याआधीच निधन झालंय तर बुधवारी तिन एका एका मुलीला नदीत फेकून दिलं. रेश्माच्या या कृत्यात  कुटुंबियांचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.