वाहतुकीच्या समस्येकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली नाही, असा दिवस जात नाही. घाईच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून पडण्याने लाखो प्रवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून भेडसावणाऱ्या या समस्येकडे शासकीय पातळीवर अद्याप गांभीर्याने पाहिले जात नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. तथापि, कोंडीची समस्या पूर्वी होती, आता राहिलेली नाही, असा युक्तिवाद महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.

किवळे ते पनवेल अशा जवळपास ९० किलोमीटरच्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. महामार्गावर होणारे अपघात, बंद पडणारी अवजड वाहने, दरड कोसळणे, आरआयबी कंपनी तसेच शासकीय पातळीवरील अनास्था, असे अनेक घटक कारणीभूत मानले जातात. एखादा अपघात झाल्यास हमखास वाहतूक कोंडी होती. तेथे मदतीसाठी यंत्रणा पोहोचेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो, वाहतूक थांबवावी लागते. घटनास्थळी मदतकार्य पोहोचून सर्व काही मार्गी लागल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होते. एक ते पाच तासापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे दाखले आहेत. गेल्या वर्षी सिमेंटचा टँकर पलटी झाल्याने दोन वेळा वाहतूक थांबवावी लागली होती. दरड कोसळली होती, तेव्हा ती काढून रस्ता पूर्ववत करण्यासाठी ३० तास लागले होते; तेव्हा शेजारच्या लेनवरून वाहतूक वळवावी लागली होती. या काळात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. दरड कोसळण्याच्याच पाश्र्वभूमीवर, प्रारंभी ३३ कोटींची कामे व दुसऱ्या टप्प्यात १२ कोटींची कामे करण्यात आली. शनिवार-रविवार म्हणजे हमखास वाहतूक कोंडी. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, ३१ डिसेंबर, एक जानेवारी अशा दिवशी तसेच जोडून सुटय़ा आल्यास, दिवाळीसारख्या सलग सुटय़ांच्या काळात एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात वाहने रस्त्यावर येतात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होतो. जड वाहने मार्गावर येणे, रस्त्यातच बंद पडणे, एकाच वेळी मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर येणे, अशी कारणे वाहतूक कोंडीला हातभारच लावतात. अवजड वाहने, कंटेनर, टँकर यासारखी वाहने उलटण्याचे प्रकार सर्रास घडतात. उन्हाळ्यात होणाऱ्या अपघातांमध्ये गाडय़ांचे इंजिन पेट घेतात. काही प्रसंगी मोटारींमघ्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्रकार झाले आहेत.  पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात, रस्त्यांच्या खाचाखोचांमध्ये पाणी साचते, त्यामुळे अपघातांना निमंत्रणच मिळते. महामार्गावरील वेगमर्यादा पायदळी तुडवली जाते. लेनची शिस्त पाळली जात नाही. याच गोष्टी पुढे डोकेदुखी निर्माण करतात. सुरक्षिततेचा उपाय म्हणून जाळ्या बसवण्यात येणार होत्या. मात्र तसे झाले नाही. महामार्गावरील वाहतुकीवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार होती. त्यादृष्टीने सर्वेक्षण झाल्याचेही सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात पुढे काहीच झाल्याचे ऐकिवात नाही. यासंदर्भात, अपेक्षित उपाययोजना होत नाहीत. घोषणा होतात, त्यादृष्टीने कार्यवाही होत नाही. एखादा मोठा अपघात झाल्यास काही काळ चर्चा होते. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झालेली असते.

लोणावळ्यातील अमृतांजन पूल हा जणू अपघातांचे केंद्रिबदू झाला आहे. द्रुतगती महामार्गावर सहा पदरी रस्ते आहेत, त्यातील तीन रस्ते मुंबईकडे तर तीन पुण्याच्या दिशेने जातात. अमृतांजन पुलाचे भले मोठे पिलर अडचणीचे असून त्या पिलरमधून रस्ता काढण्यात आला आहे. या अरूंद रस्त्यावरच वळणाचा मार्ग आहे. येथे अवजड वाहनांचे नियंत्रण सुटते व अपघात होतात. अवजड वाहने अडकून पडतात, असे अनुभव आहेत.

द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या पूर्वी होती, आता त्याची तीव्रता व प्रमाण खूपच कमी झाले आहे. सततच्या कोंडीचा अभ्यास केल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे केलेली उपाययोजना उपयुक्त ठरली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी उपाययोजना करण्यात येत आहेत. गाडय़ांचे प्रमाण जास्त असलेल्या तासांमध्ये ‘गोल्डन अवर’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जड व हलकी वाहने एकाच वेळी येऊ नयेत, याची खबरदारी घेतानाच शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी सकाळी मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या तसेच रविवारी संध्याकाळी व सोमवारी सकाळी पुण्याहून मुंबईकडे मोठय़ा संख्येने जाणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. सलग सुटय़ा आल्यानंतर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येचाही विचार करण्यात आला आहे. अवजड वाहनांवर बंधने घालण्यात आली असून त्याप्रमाणे कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. नऊ ठिकाणी ‘फिक्स पॉईन्ट’ करण्यात आले आहेत. वाहतुकीला कुठेही अडथळे निर्माण झाल्यास तातडीने यंत्रणा उपलब्ध करता येते. आवश्यकतेनुसार पुढील वाहतूक वळवता येते.

अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, द्रुतगती महामार्ग