िपपरी पालिका सभेच्या दोन वेगवेगळ्या तारखांमुळे प्रशासनाची पंचाईत

िपपरी महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. महापौरांनी २० जुलैची सर्वसाधारण सभा तहकूब करून ती २६ जुलैला घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात, ही सभा ५ ऑगस्टला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्याची सभा बुधवारी (२० जुलै) होती. कोपर्डी येथील घटनेचा निषेध करून ही सभा तहकूब करण्यात आली. पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांनी तहकूब झालेली ही सभा मंगळवारी २६ जुलैला घेण्यात येईल, असे सभेतच जाहीर केले होते. प्रत्यक्षात, ही सभा ५ ऑगस्टला होणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांनी ५ तारखेची सूचना मांडली व त्यास अपर्णा डोके यांनी अनुमोदन दिले आहे. महापौर व सदस्यांनी सभेसाठी परस्परविरोधी तारखा जाहीर केल्याने प्रशासनाची पंचाईत झाली होती. नगरसचिव उल्हास जगताप यांनी ही चूक महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, महापौरांनी ५ ऑगस्टच्या तारखेवर संमती दर्शवली. त्यानंतर, एका नोटिसीद्वारे बदललेली तारीख सदस्यांना कळवण्यात आली. त्यानुसार ५ ऑगस्टला दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.