लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली बंडाळी पिंपरी महापालिकेच्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत उफाळून आली असून, हा पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. लोकसभेचे शेकापचे उमेदवार व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी परस्पर अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. याउलट अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना सूचक-अनुमोदकच न मिळाल्याने शहराध्यक्ष व सभागृह नेत्यांना कसरत  करावी लागली. दरम्यान, सहा पदांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही निवडणूक सोमवारी (२८ एप्रिल) होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या राजकीय उलथा-पालथीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता समीकरणे बदलली आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीकडे १२८ पैकी ९३ नगरसेवक असल्याने निर्विवााद बहुमत आहे. मात्र, आता हा पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर आहे. शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांनी आता वेगळी चूल मांडली आहे. तेच प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. आमदार जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी सभापतिपदासाठी शुक्रवारी परस्पर अर्ज सादर केले. त्यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या नगरसेवकांची सूचक अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या घेतल्या.
पक्षाच्या सभागृहनेत्या मंगला कदम यांनी गेल्या आठवडय़ातच इच्छुक नगरसेवकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्या वेळी जगताप समर्थक नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि शुक्रवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये उपमहापौर राजू मिसाळ, ‘अ’ प्रभागाचे अध्यक्ष जावेद शेख, नगरसेवक बाळासाहेब तरस, अविनाश टेकवडे, विनायक गायकवाड, शेखर ओव्हाळ, माया बारणे, शैलजा शितोळे, सोनाली जम, सुषमा तनपुरे, नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, शकुंतला धराडे, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे आदींचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांसाठी सूचक व अनुमोदकांची नावे मिळवण्यासाठी शहराध्यक्ष व सभागृहनेत्यांना कसरत करावी लागली. कारण राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच सूचक व अनुमोदक होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सभागृहनेत्या व शहराध्यक्षांना स्वतच सूचक व अनुमोदक व्हावे लागले. प्रभाग समित्यांची सभापतिपदे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असायची. आता मात्र चित्र बदलण्याची शक्यता असून, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.