जगावर अनेक तत्त्वचिंतकांनी भाष्य केले परंतु जग बदलवण्यासाठी काय केले. या मार्क्‍सच्या वचनाप्रमाणे भारत-पाकिस्तान चर्चा करून अर्थ नाही. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी काय केले पाहिजे, यावर भर दिला पाहिजे. जगभरात सर्वात वाईट शेजारी म्हणून भारत-पाककडे पाहिले जाते. त्यामुळे भारत-पाकने भूतकाळाचे तुरुंग फोडून बाहेर पडण्याची गरज ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुळकर्णी यांनी रविवारी बोलून दाखवली.

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘भारत-पाकिस्तान संवादाची उपयुक्तता आणि गरज’ या विषयावर कुळकर्णी बोलत होते. दोन्ही देशांतील सामान्य नागरिक, शांतीसाठी प्रयत्नशील कार्यकर्ते, लष्कर, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर याबाबत त्यांनी भाष्य केले.

भारत-पाक पास-पास आहेत साथ-साथ का नाहीत? असा सवाल करून कुळकर्णी म्हणाले, सार्क परिषदेतून भारताने बाहेर पडावे, याबरोबरच मोदींनी पाक सोडून इतर दक्षिण आशियाई देशांना घेऊन सार्क परिषद स्थापन करावी, अशी मागणी होत आहे. यातून दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडतील. दोन्ही देशांतील धार्मिक कट्टरतावाद वाईट असून चांगले-वाईट दहशतवादी असा भेद पाकिस्तानने करू नये, सीमेवर होणारा पाकपुरस्कृत दहशतवाद जोवर थांबत नाही तोवर उभय देशांतील चर्चा एकही इंच पुढे जाणार नाही. कुलभूषण जाधव यांना सुरक्षित परत भारतात पाठवण्याची व्यवस्था पाकने करावी.

१९२० साली टिळक युगाचा अस्त झाला. टिळकांना नियतीने आणखी दहा-पंधरा वर्षे दिली असती तर स्वातंत्र्यसंग्रामाची दिशा आणि त्याचे परिणाम बदलले असते. कदाचित फाळणी झाली नसती आणि जर पाक जन्माला आले असते तरी उभय देशात संबंध वेगळे झाले असते, नव्हे तर अधिक मैत्री, सौहार्दाचे झाले असते. टिळकांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि लवचिकता आज दोन्ही देशांतील नेते दाखवू शकले तर काश्मीर प्रश्न शांतीच्या मार्गाने सोडवू शकतो.

लाल शाहबाज कलंदर या सूफी दग्र्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या दुसऱ्याच दिवशी कथक नृत्यांगनेने नृत्य सादर करून दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले. त्या महिलेचे छायाचित्र पाकिस्तानातील सर्व वृत्तपत्रांत छापले मात्र, भारतातील एकाही वृत्तपत्राने त्याची दखल घेतली नाही. तसेच होळीनिमित्त पाकमधील एका हिंदू संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हजेरी लावली. पाकिस्तानातील अशा सकारात्मक गोष्टी भारतीय माध्यमे दाखवत नाहीत, अशी खंत सुधींद्र कुळकर्णी यांनी व्यक्त केली.