केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी सर्वसामान्यांची धडपड सुरू आहे. सरकारने अनेकदा मुदतवाढ देऊनही ५०० आणि १००० च्या नोटा अनेकांकडे सापडल्याच्या घटना समोर येत आहे. बारामती येथेही आज तब्बल ६ कोटी ८९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, ही रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याची माहिती मिळते.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरात एकच चलनकल्लोळ सुरू झाला. चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सर्वसामान्यांनी बँकांसमोर रांगा लावल्या. मात्र, ज्यांच्याजवळ या जुन्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांची धावपळ उडाली. अशातच अनेक ठिकाणी या जुन्या नोटा पकडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात नागपूर, उस्मानाबाद, पुणे, नगर आदी ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधींची रक्कम पकडण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास बारामती मार्गावरील भिगवण टोलनाक्याजवळ निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वाहनातून ६ कोटी ८९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सापडलेल्या रकमेमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा आहेत.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केलेली रक्कम ही बारामती सहकारी बँकेची असल्याची माहिती समजते. याप्रकरणी निवडणूक आयोगाचे भरारी पथक तपास करत आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येत आहे. ही रक्कम बँकेच्या विविध शाखांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी जुन्या नोटा असलेली कोट्यवधींची रक्कम निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि पोलिसांनी पकडली आहे.

नगरमध्येही ३८ लाखांच्या जुन्या नोटा पकडल्या

अहमदनगर शहरातही पोलिसांनी एक हजारांच्या जुन्या नोटा असलेली ३८ लाख ५० हजार रुपयांची रोकड पकडली आहे. महावीरनगरमधील राहुल भंडारी हा बॅगमधून रोकड घेऊन जात होता. पोलिसांनी संशयावरून त्याची बॅग तपासली. त्यावेळी बॅगमध्ये जुन्या १००० रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. दरम्यान, खऱ्या नोटांसोबत खोट्या नोटाही या बॅगमध्ये होत्या. खऱ्या नोटांसोबत बॅगमध्ये खोट्या नोटा का ठेवण्यात आल्या, याचा तपास पोलीस करत आहेत.