देहूरोड रेल्वे स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशनदरम्यान चालत्या लोकलमधून तिघे जण खाली पडले. या घटनेत महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाली असून मैत्रिणीसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
निकिता आगरवाल (वय १८, रा. देहूरोड) हिचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तिची मैत्रीण हर्षदा तलारी (वय १९, रा. देहूरोड) आणि धनराज तोडकर (वय २६) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर देहूरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देहूरोड रेल्वे स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या बोपदेवनगर येथे रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलने निकिता आणि तिची मैत्रीण हर्षदा या दोघी घरी चालल्या होत्या. त्या दोघीही दरवाज्यामध्ये बाहेर पाय सोडून बसल्या होत्या. काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कामगाराने आपली पहार खडीमध्ये रोवलेल्या स्थितीत उभी केली होती. त्या ठिकाणी लोकल आली असता निकिता हिची चप्पल त्या रोवलेल्या पहारीमध्ये अडकली. त्यामुळे निकिताचा तोल गेला. या वेळी तिला वाचवायला गेलेली हर्षदा आणि त्या दोघींना वाचविण्यासाठी प्रयत्न करणारा धनराज असे तिघेही चालत्या गाडीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये डोक्याला मार लागल्याने निकिता हिचा जागीच मृत्यू झाला. तर, तिला वाचविण्याचा प्रयत्न करणारे हर्षदा आणि धनराज हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देहूरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.