पौर्णिमा हत्तिणीचा मृत्यू नैसर्गिक नसून उपासमार आणि तहानेने झाला आहे, असा आरोप पीपल फॉर अॅनिमल (पीएफए) आणि पॉज् या संस्थांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने संबंधितांना नोटीस पाठवली आहे.
पौर्णिमा हत्तिणीचा नुकताच मृत्यू झाला होता. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले होते. पीएफएतर्फे मार्चमध्ये हत्तिणीची पाहणी करण्यात आली होती. पौर्णिमाला अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे, तसेच तिला उन्हात ठेवल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप या संस्थांनी केला आहे. यासंदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून न्यायालयाने वन विभाग आणि हत्तिणीचे मालक दिनेश तिवारी यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती पॉज्चे मनोज ओसवाल यांनी दिली. पीएफएने न्यायालयात वैद्यकीय अहवालही सादर केला आहे. त्याच्या आधारे न्यायालयाने नोटीस दिल्याचे ओसवाल यांनी सांगितले.
‘‘दोन महिन्यांमध्ये तहान आणि उपासमारीमुळे हत्तिणीची हाडे दिसू लागली होती. तज्ज्ञांचा सल्ला न घेता तिच्यावर उपचार करण्यात आले, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम झाला. तसेच तिला उन्हात ठेवण्यात आले होते. या कारणांमुळे तिचा मृत्यू झाला,’’ असे ओसवाल म्हणाले.