माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ‘दोन हात’ करून पिंपरी पालिकेची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे रचलेल्या शहर भाजपमध्ये सध्या वेगळ्याच विषयावरून तीव्र खदखद सुरू आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक मोठी फळी पक्षातील दोन व्यक्तींच्या कार्यपध्दतीवरून कमालीची हैराण आहे. खासदार अमर साबळे यांचे ‘उजवे हात’ मानले जाणारे माउली थोरात आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचा सध्याचा ‘ब्रेन’ म्हणून ओळखले जाणारे ‘लॅपटॉप बाबा’ उर्फ सारंग कामतेकर.
सात महिन्यापूर्वी साबळे राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हापासून माउलींचा भाव वधारला आहे. पूर्वीपासून माउली खासदारांच्या खास मर्जीतील आहेत. खासदारांची महत्त्वाची कामे माउलींवर अवलंबून असतात. खासदार व्यग्र असल्याने बहुतांश काम ते माउलींकडे सोपवतात. कोणाचे काही असले की, माउलींना भेटा, असे ते सुचवतात. मुळातच वेगळी कार्यपध्दती असलेले माउली स्वत: खासदार असल्याच्या थाटात वावरतात, ते सांगतील, तेच खासदार खरे मानतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये झाल्याने पक्षात अस्वस्थता आहे. खासदारांना हे सर्व माहिती आहे. मात्र, ते माउलींच्या मागे ठामपणे उभे आहेत.
दुसरीकडे, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले कामतेकर हे एकेकाळी गजानन बाबर यांचे ‘सर्वेसर्वा’ होते. ‘लॅपटॉप’ हे त्यांचे मोठे शस्त्र आहे. कामतेकरांनी सध्या जगतापांचा पूर्ण ताबा घेतल्याचे चित्र आहे. काही महिन्यापूर्वीच भाजपमध्ये आलेल्या कामतेकरांना थेट नेत्याचा दर्जा आहे. ते राज्यातील, केंद्रातील मंत्री अथवा बडय़ा नेत्यांशी थेट संपर्क साधू शकतात, शासकीय अधिकाऱ्यांशी बैठका करू शकतात, अधिवेशन काळात त्यांचा मुक्त वावर असतो, त्याचे कारण आमदारांचा ‘वरदहस्त’ आहे. आमदारांशी बोलायचे असल्यास, त्यांना भेटायचे असल्यास कामतेकरांना भेटावे लागते. त्यामुळे जगतापांचे अनेक जुने सहकारी दुखावले आहेत. आमदारांनी आतापर्यंत अनेकांच्या नियुक्तया केल्या, त्यातील बहुतांश कामतेकरांच्या जवळच्या होत्या, असे पक्षवर्तुळातून सांगितले जाते. कामतेकरांचे नाव आता भाजप शहराध्यक्षपदाच्याही स्पर्धेत आहे. आमदारांना पक्षातील खदखद माहिती आहे. मात्र, आपण त्या गावचेच नाही, अशा आविर्भावात ते असतात. खासदारांचा ‘माउली’ आणि आमदारांच्या ‘लॅपटॉप बाबा’च्या वाढत्या प्रस्थामुळे पक्षात अस्वस्थता असली तरी उघडपणे कोणी बोलत नाही. मात्र, अशी परिस्थिती असल्याचे नाकारतही नाहीत.