गटबाजीला वैतागलेल्या पिंपरीच्या शकुंतला धराडे यांचा उद्वेग

दुहेरी निष्ठेवरून भाजप-राष्ट्रवादीच्या कात्रीत सापडलेल्या महापौर शकुंतला धराडे यांना पवनाथडी जत्रेच्या आयोजनापासून दूर ठेवण्यात आल्याने मानापमान नाटय़ तर घडलेच, ‘महापौर विरुद्ध राष्ट्रवादी’ असे चित्र नव्याने पुढे आले. पवनाथडीच्या उद्घाटनाची तारीख परस्पर बदलण्यात आली व त्याची माहितीही न दिल्याने संतापलेल्या महापौरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ‘मी केवळ सहय़ा करण्यापुरती महापौर आहे का?’, असा त्यांनी व्यक्त केलेला उद्वेग पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपरी की सांगवी, या वादात अडकलेल्या पवनाथडीला यंदा भोसरी मैदानाचा पर्याय मिळाला आहे. यापूर्वी ठरल्यानुसार १५ डिसेंबरला पवनाथडीचे उद्घाटन होणार होते. मात्र, त्यात बदल करून एक दिवस आधीच उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. मात्र, याबाबतची माहिती खुद्द महापौरांनाच नव्हती. ऐनवेळी त्यांना हे समजल्याने त्यांचा संताप झाला.

पवनाथडीच्या नियोजनापासून दूर ठेवण्यात आल्याचा राग महापौरांच्या मनात होताच. सत्ताधाऱ्यांकडूनच वारंवार अपमान होत असल्याची सलही त्यांच्या मनात होती. त्यातच पवनाथडीचे निमित्त घडले आणि त्यांचा पारा चढला. भर पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि मी फक्त सहय़ांपुरती महापौर आहे का, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उघड झाली. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी विरुद्ध महापौरांचा संघर्षही पुन्हा दिसून आला.

 

पवनाथडीत सायंकाळी होणारे कार्यक्रम

* १५ डिसेंबर- ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’

*  १६ डिसेंबर- ‘विडा रंगला ओठी’

*  १७ डिसेंबर- ‘नटखट अप्सरा’

*  १८ डिसेंबर- ‘खेळात रंगली पैठणी’

*  १९ डिसेंबर- ‘पवनाथडीची, हवा येऊ द्या’