अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यकच; पिंपरी पालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेचे अधिकारी सर्वसाधारण सभा तसेच विषय समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत, खोटी कारणे देत दांडय़ा मारतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्याने त्याची गंभीर दखल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. यापुढे अधिकाऱ्यांनी बैठकांना वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे, असे लेखी आदेशच दिले आहेत. दांडय़ा मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापालिकेचे अधिकारी बहुतांश वेळा जागेवर नसतात. नगरसेवक अथवा नागरिक भेटण्यासाठी आल्यास ‘साहेब, व्हिजिटला गेले आहेत’ किंवा ‘बाहेर आहेत’, अशी ठरावीक उत्तरे कार्यालयातून दिली जातात. सदस्यांना आपल्या समस्या, मुद्दा मांडण्यासाठी समित्यांच्या बैठका हे हक्काचे व्यासपीठ असते. मात्र, त्याही ठिकाणी मोठे अधिकारी दांडय़ा मारतात आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला पाठवून देतात. काही अधिकारी पालिका सभांनाही जुमानत नाहीत. गैरहजेरीविषयी कोणी विचारणा केलीच तर आमच्या विभागाचा विषय नव्हता, असे कारण ते पुढे करतात. यावरून सदस्यांनी यापूर्वीही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत तत्कालीन आयुक्तांनी अशाच प्रकारचे लेखी आदेश काढले आहेत. ३० ऑगस्ट २०१२, त्यानंतर २८ जुलै २०१४ आणि १९ मे २०१६ रोजी अशीच तंबी देणारे आदेश आयुक्तांनी काढले होते. मात्र, त्यास अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. आता त्याच त्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी नव्याने फर्मान काढले आहे. त्यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार, विषय समित्यांच्या बैठकांमध्ये ऐन वेळी कोणतेही विषय उपस्थित होत असतात. अशा वेळी संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी हजर असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सदस्यांमध्ये नाराजी आहे. तशा तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सदस्यांची मागणी आहे. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी पालिका सभा, स्थायी समिती तसेच इतर विषय समित्यांच्या बैठकांसाठी नियोजित वेळेपूर्वी हजर राहिले पाहिजे. काही अधिकारी विनापरवानगी बैठकांना गैरहजर राहतात, ते खपवून घेतले जाणार नाही. जे अधिकारी बैठकांना दांडय़ा मारतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे.