पिंपरी पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दिमतीला असलेल्या मोटारींच्या चालकांची वर्षांनुवर्षे फरफट होत असूनही त्यांच्या त्रासाकडे कोणाचेही लक्ष नाही. सकाळी नऊपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ‘साहेब’ मंडळींच्या सेवेत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांची, सग्यासोयऱ्यांची व कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवावी लागत असल्याने चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या पतिराजांचा सर्वाधिक कहर असून ‘ओव्हर टाइम’ नको, पण हा त्रास आवरा, अशी चालकांची भावना झाली आहे.
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, चार विषय समित्यांचे अध्यक्ष, चार प्रभाग अध्यक्ष, शिक्षण मंडळ सभापती व उपसभापती अशा जवळपास १५ पदाधिकाऱ्यांना तसेच आयुक्तांपासून ते वरिष्ठ दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना मोटार व चालकाची सुविधा दिली जाते. पालिकेच्या कामांसाठी व निर्धारित वेळेत या मोटारी वापरणे अपेक्षित असताना खासगी कामांसाठी आणि वेळीअवेळी कधीही त्याचा वापर केला जातो. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत चालकांना वेगवेगळय़ा पद्धतीची कामे करावी लागतात. पोरांना शाळेत, शिकवणीला न्या, मंडईतून भाजी आणा, पेपर व दूध आणा, पार्लरला न्या, विवाह सोहळय़ांना घेऊन जा, देवदर्शन करून आणा, पाहुण्यांना-कार्यकर्त्यांना फिरवून आणा, अशी कामे ठरलेली आहेत. पतिराजांचे त्रास जास्त आहे. एका प्रभाग अध्यक्षाच्या पतीने मुंबई, नागपूरला मोटार फिरवल्याचे प्रकरण बरेच गाजले होते. कारभाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अनेक चालकांनी बदली करवून घेतली. पेट्रोलचोरी करायला पाठबळ देऊन चालकाकडून हिस्सा मागितला गेल्याचे आणि ‘नको तिथे’ गाडय़ा नेऊन केलेल्या विविध उद्योगांचे किस्से आजही सांगितले जातात. महिला पदाधिकारी घरी असताना कारभारी दारोदारी फिरत असतात. अंत्यविधी, दहावा, साखरपुडा, लग्न, पूजा व अन्य सभारंभांसाठी जाणाऱ्या कारभाऱ्यांना वेळेचे बंधन नसते. काही महिला पदाधिकाऱ्यांचे पती मोटारीत कधी बसले नाही व कार्यालयाकडेही फिरकलेच नाहीत, असाही अनुभव आहे.
केवळ पदाधिकाऱ्यांपुरता चालकांना त्रास नसून अधिकारीवर्गाकडूनही वेगळय़ा पद्धतीने ससेहोलपट होते. अधिकाऱ्यांची पाकिटे व भरलेल्या बॅगा आणण्याचे कामच अनेकांना करावे लागते. आतापर्यंत हे सगळे बिनबोभाट सुरू होते. आता नियमावर बोट ठेवणारे आयुक्त आल्याने चालकांचे धाबे दणाणले आहे. आयुक्त घरी गेल्यानंतर चालकास मोकळे करतात व स्वत:ची खासगी मोटार वापरतात. त्यामुळे अशाप्रकारच्या अतिरिक्त सेवेविषयी आपल्याकडे विचारणा झाल्यास काय उत्तर द्यायचे, याची धास्ती चालकांना आहे. एकतर हक्काच्या सुटय़ा घेता येत नाही. सुटीवर असला तरी बोलावून घेतले जाते. कुटुंबीयांना वेळ देता येत नाही, कशाचे नियोजन करता येत नाही. पदाधिकाऱ्यांची कामे न केल्यास खोटय़ा तक्रारी करून कारवाई केली जाते. दोन्हीकडून कात्रीत सापडल्याने फरफट होत असल्याने आमच्या कामाचे निश्चित धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे.