पिंपरी पालिकेच्या ‘लक्ष्य २०१७’ मधील सत्तासंघर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस हाच आपला प्रमुख शत्रू राहणार आहे. राष्ट्रवादीशी ‘दोन हात’ करणारा आणि अजितदादांची ‘दादा’गिरी मोडून काढणारा शहराध्यक्ष पाहिजे, या शब्दात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आपल्या भावना निवडणूक निरीक्षक व खासदार दिलीप गांधी यांच्यापुढे मांडल्या.
पिंपरी जिल्हा संघटनात्मक निवडणुकीसाठी आकुर्डीत बैठक झाली, अध्यक्षस्थानी खासदार गांधी होते. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, संघटनमंत्री रवी अनासपुरे आदी उपस्थित होते. या वेळी पिंपरी शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार, डिसेंबरमध्ये शहराध्यक्षपदाची निवड होणार आहे. यासाठी खाडे, महेश कुलकर्णी, बाळासाहेब गव्हाणे, उमा खापरे, माउली थोरात, मोहन कदम आदींची नावे चर्चेत आहेत. शहराध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे एकनाथ पवारांनी बैठकीत जाहीर केले. आमदार जगतापांनी शहराध्यक्षपद स्वीकारावे, असा आग्रह पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. तथापि, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बैठकीत मार्गदर्शन करताना गांधी यांनी, संघटनात्मक बांधणी व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पालिकाजिंकू, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या १५ वर्षांत विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादीने पिंपरी पालिकेची लूट केली, हे मतदारांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले. साबळे यांनी खासदार झाल्यानंतर केलेल्या कामाची माहिती दिली. स्वत:ला तपासून पाहण्याचा सल्ला जगतापांनी कार्यकर्त्यांना दिला. सभासद नोंदणी व संघटनात्मक कामाची दखल घेऊन खाडे यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले. अमोल थोरात यांनी आभार मानले.