पिंपरीत इच्छुक उमेदवारांचे नेत्यांना साकडे; जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्याचा परिणाम

‘कुणी तिकीट देता का तिकीट,’ अशी विचारणा करणारे अनेक उमेदवार सध्या दिसत आहेत. विशेषत खुल्या प्रवर्गातून लढण्यासाठी तीव्र इच्छुक असणारे उमेदवार अशाप्रकारचे साकडे नेते मंडळींना घालत आहेत. जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.

पिंपरी महापालिकेच्या निवडणुका रंगतदार होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. भोसरी, चिंचवड, निगडी, वाकड, पिंपरीच्या गावठाण भागांसह नव्याने तयार झालेल्या काही प्रभागांमध्ये होत असलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत आहेत. विशेषत खुल्या प्रवर्गातील तसेच सर्वसाधारण महिला गटांमध्ये अटीतटीची स्पर्धा जाणवते आहे. प्रत्येक प्रभागात किमान एक खुली जागा तर एक सर्वसाधारण महिलेसाठी राखीव जागा आहे, तेथे ही चढाओढ आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रभागाचे क्षेत्र दुप्पट असल्याने नव्या भागातील इच्छुकांची भर पडली आहे.

तिकिटासाठी स्पर्धा

  • चिंचवडच्या खुल्या गटातील जागेसाठी मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे भाजपकडून लढण्यास उत्सुक होते. मात्र, तेथे संधी मिळणार नसल्याची खात्री झाल्याने त्यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला.
  • भाजपमध्ये दररोज वेगवेगळी नावे पुढे येतात आणि मागे पडतात. कारण, शहराध्यक्ष एका विशिष्ट नावासाठी ठाम आहेत.
  • महिला गटासाठी विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला उमेदवाराचा शोध काही केल्या पूर्ण होताना दिसत नाही.
  • सांगवीत राजेंद्र जगताप व नवनाथ जगताप हे नात्याने काका-पुतणे असलेले दोन नगरसेवक एकमेकांच्या स्पर्धेत उतरले आहेत. कोणाला तिकीट द्यायचे यावर एकमत होत नसल्याने तिढा कायम आहे.
  • दापोडी-कासारवाडी प्रभागातील खुल्या जागेसाठी ‘काटय़ाची स्पर्धा’ आहे. राष्ट्रवादीचे संजय काटे, रोहित काटे, किरण मोटे तीन नगरसेवक व प्रभाग स्वीकृत सदस्य सतीश काटे तिकिटासाठी इच्छुक आहेत.
  • खराळवाडी-नेहरूनगर-मासूळकर कॉलनी या विचित्र रचना असलेल्या प्रभागात खुल्या गटाप्रमाणेच महिला गटातही चुरस आहे.
  • वाकडमध्ये दोन जागा खुल्या गटासाठी असूनही उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. प्राधिकरणातील खुल्या जागेवर अनेकांचा दावा आहे.