पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच निगडी प्राधिकरण येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी १० तोळे सोने आणि अडीच लाखांची रोकड पळवली आहे. ही घटना काल सकाळी नऊ ते रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली.

नवी मुंबईत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिंपरी – चिंचवडमधील उच्चभ्रू वसाहतीतीत घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यात चोरट्यांनी तीन तोळे सोने आणि १ लाख रुपये लंपास केले होते. या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले असतानाच निगडी प्राधिकरण येथे भरदिवसा घरफोडी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील सेक्टर २७, प्लॉट क्रमांक ३१३ या ठिकाणी घरफोडी केली आहे. चोरट्यांनी दरवाजाचे टाळे तोडून घरात प्रवेश केला. घरातील १० तोळे सोने, २ लाख ५० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना काल (ता. २०) घडली. संजय काणमल जैन (वय – ४२) असे घरमालकाचे नाव आहे. संजय हे सकाळी कामावर गेले होते. घरात कुणी नसल्याने चोरट्यांनी संधी साधली. कामावरून परतल्यानंतर घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.