पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे. आज (गुरूवार) एका एक वर्षीय चिमुरड्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. चिखलीतील या चिमुरड्यावर महापालिकेच्या यशवंत चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दि. २० मार्चपासून उपचार सुरु होते. मात्र आज त्याला मृत्यूने अखेर गाठलेच. अनिकेत हंडे असे मुलाचे नाव आहे. शहरातील अन्य खासगी रुग्णालयात ३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवडमधील स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा आता सातवर पोहोचला आहे.
गेल्यावर्षी स्वाईन फ्लूमुळे पिंपरी चिंचवड शहरात ६४ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. तर सद्यस्थितीला पिंपरी चिंचवडमधील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सात झाली आहे. पिंपरी चिंचवड महापलिका स्वाइन फ्लू रोखण्यात अपयशी ठरत आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत.
स्वाइन फ्लूची आकडेवारी खालील प्रमाणे-
मृत्यू: सात, अतिदक्षता विभागातील रुग्ण: ३.
स्वाइन फ्लूची लक्षणे पुढीलप्रमाणे..
घसा खरखर करणे, ताप येणे, खोकला, अशक्तपणा आणि सर्दी
स्वाइन फ्लूवरील उपाययोजना-
अंग दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे.
बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क घालणे.
भरपूर पाणी पिणे.