पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांमध्ये वाहनचोरीमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणारा आरोपी पिंपरीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्र्वर मेरूरकर यास वैभवनगर येथून अटक केली. चौकशीत त्याने तब्बल १६ गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४१२ ग्रॅम सोनं, ४०० ग्रॅम चांदी, ४ लॅपटॉप, २ कॅमेरे, असा एकूण १३ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत, एका सराईत इराणी आरोपीला अटक करण्यात आली. तालिब रफिक बेग असं या इराणी आरोपीच नाव असून त्याच्याकडून ५५ हजार ७५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी ३ गुन्हे नोंद आहेत. आणखी एका घटनेत, दुचाकी चोरणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. त्यांनी चौकशी दरम्यान १२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पिंपरीचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, उमेश वानखेडे, संतोष भालेराव यांनी ही कारवाई केली.