आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा विश्वास

वेगाने विकसित होत असलेले पिंपरी-चिंचवड शहर आगामी पाच वर्षांत खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वास पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.

महापालिकेच्या वतीने ‘सिट्रस’ येथे आयोजित ‘सीएसआर’ बैठकीत ते बोलत होते. महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, अनंत सरदेशमुख यांच्यासह उद्योग क्षेत्रातील ४० प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उद्योजकांनी शहरविकासाच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. उद्योजकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, शहरात मोठय़ा प्रमाणात कारखानदारी आहे. तीन नद्या शहरातून जात आहेत. अनेक बाबतीत शहरात काम करण्यास वाव आहे. ‘सीएसआर’ साठी महापालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. उद्योजकांनी हातभार लावावा. महापौर काळजे म्हणाले, अशाप्रकारची बैठक प्रथमच होत आहे. उद्योजकांनी शहरातील प्रकल्पांसाठी सहकार्य करावे. आ. जगताप म्हणाले, उद्योजकांनी सामाजिक हितासाठी सहकार्याची भूमिका ठेवावी आणि शहरविकासासाठी योगदान द्यावे. सावळे म्हणाल्या, शिक्षणाचा दर्जा, इंग्रजी शिक्षण आणि स्वस्तातील औषधोपचारांसाठी ‘सीएसआर’मार्फत सहकार्य व्हावे. पवार म्हणाले, नव्या प्रकल्पांसाठी सहकार्य मिळावे.