पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कसबा आणि सोमवार पेठेतील प्रभागात झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांचा ३ हजार ७०० मतांनी पराभव केला. या विजयानंतर रवींद्र धंगेकर म्हणाले, भाजपकडून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविले होते. मात्र मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुमच्या पक्षातील कनिष्ठ पातळीवरील लोकांशी माझे जमत नाही. त्यामुळे तुम्हाला मला पक्षात घेता येणार नाही. मी स्पष्टपणे बोलल्याने चर्चा तिथेच थांबली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या अतंर्गत अहवालात मी निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मला बोलावण्यात आले होते.

पुढील काळात आपण काँग्रेसबरोबर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही त्यामुळे आपण मनसे सोडली असे धंगेकर म्हणाले. कसबा प्रभागातील जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले. जर जागा मालक आणि भाडेकरीमधील वाद मिटण्यासाठी एफएसआय वाढून दिल्यास नक्कीच वाड्यांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच मंगळवार पेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असून त्याचे पुर्नवसन करण्यासाठी नागरिकांशी चर्चा तिथे विकास कामे करणार आहे.

पुण्यातील निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांचे प्रभाग क्रमांक १६ कडेच लक्ष होते. गणेश बिडकर विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होती. या दोघांमध्ये सभागृहात आणि सभागृहाबाहेरही शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्या पासून रविंद्र धंगेकर हे पक्ष बदलण्याच्या तयारीमध्ये होते. त्यांनी अगदी सुरुवातीला राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली होती. पण भाजपमधील अंतर्गत विरोधामुळे त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही. त्यांच्या प्रवेशाला गणेश बिडकर यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. धंगेकर यांना संधी मिळाली असती तर बिडकर यांचे पक्षातील महत्त्व कमी झाले असते. गेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्याविरोधात धंगेकर उभे होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. हे सर्व पाहता बिडकर यांनी धंगेकर यांना तिकीट मिळू नये. यासाठी खूप प्रयत्न केले गेले. या सर्व घडामोडींनंतर धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचे दार ठोठावले आणि त्यांना त्यामध्ये यश आले. गेल्या कित्येक वर्षांपासून जनतेची कामे केल्या मुळेच आपण निवडून आलो असे ते म्हणाले. भविष्यातही चांगली कामे करुन लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे असे ते म्हणाले.