महापौरपदी आपल्या इच्छेनुसार उमेदवाराची निवड करण्यासाठी प्रयत्नशील

महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर आणि अन्य महत्त्वाच्या पदांसाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झालेली असतानाच महापौरपदी आपलाच उमेदवार बसावा यासाठी खासदार संजय काकडे सक्रिय झाल्याचे पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि निष्ठावंतांमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना ज्या पद्धतीने पक्षातील निष्ठावंतांचा बळी देण्यात आला तसाच प्रकार महापौर निवडणुकीतही होणार का, अशी विचारणा पक्षात सुरू झाली आहे.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला स्वबळावर निर्विवाद बहुमत मिळाले आहे. निवडणुकीत तब्बल ९८ जागा मिळवत भाजपने महापालिकेतील सत्ता मिळवल्यानंतर साहजिकच महापौर कोण होणार, याबाबत चर्चा सुरू झाली. महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटातील महिलेसाठी असल्यामुळे पक्षातील काही नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यात सर्वात आघाडीवर मुक्ता टिळक यांचे नाव असून त्या यावेळी चौथ्यांदा महापालिकेत निवडून आल्या आहेत. टिळक यांच्या बरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी दोन तास भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या रेश्मा भोसले यांचेही नाव या पदासाठी सध्या चर्चेत आहे. कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असतानाही भोसले यांना भाजपने पुरस्कृत केले. रेश्मा भोसले यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी खासदार संजय काकडे आग्रही होते आणि त्यांच्या प्रयत्नातूनच भोसले यांचा पक्षप्रवेश झाला असे पक्षातून सांगण्यात येते. टिळक यांच्या बरोबरीने भोसले यांचे नाव चर्चेत आणले जात असल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकीपूर्वीही काकडे सक्रिय झाल्यानंतर पक्षात नाराजी व्यक्त झाली होती. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही जाहीर वक्तव्य करताना एक-दोन कार्यक्रमांमध्ये काकडे यांच्यावर टीका केली होती.

पक्षबाह्य़ सत्ताकेंद्र चालवून काकडे यांनी शहर भाजपचा ताबा घेण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केल्याची चर्चा पक्षात आहे. त्यातच निवडून आल्यानंतर लगेचच रेश्मा भोसले यांनीही महापौरपद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. भोसले घराण्याच्या  राजकारणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या वर्षांत हे महत्त्वाचे पद मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मुळातच यापूर्वी भाजपला वेळोवेळी विरोध करणाऱ्या, पक्षाच्या कार्यप्रणालीवर सातत्याने टीकेची झोड उठविणाऱ्या आणि राजकीय सोयरीक जमवून पक्षात आलेल्यांना हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद त्यांच्या घराण्याचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी का द्यायचे, असा प्रश्न भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विचारण्यास सुरुवात झाली आहे. रेश्मा भोसले यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी जाणीवपूर्वक त्यांचे नाव चर्चेत आणले जात आहे, असेही सांगितले जात आहे.