सत्ताप्राप्तीसाठी तोडफोडीचे राजकारण करत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यमान नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला. या आयारामांच्या जिवावर भाजपला उपनगरांमध्ये मोठे यश मिळाले असून भाजपच्या तिकिटावर अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेले तीस नगरसेवक विजयी झाले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांपैकी एक माजी आणि एक विद्यमान नगरसेवकाला पराभवाचा सामना करावा लागला, तर एका नगरसेविकेला प्रवेश झाल्यानंतरही तिकीट नाकारण्यात आले होते.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भारतीय जनता पक्षाने ‘आयारामांवरच’ भिस्त ठेवली होती. त्यासाठी त्यांनी भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचीही उमेदवारी नाकारली होती. विशेषत: उपनगरांमधील आयारामांचे प्रमाण मोठे होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तब्बल ११ विद्यमान नगरसेवकांपैकी दहा नगरसेवकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पक्षाने उमेदवारी दिली होती, तर अन्य पक्षातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरही विश्वास टाकला होता. महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बाहेरहून आलेल्या एकूण ४७ जणांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ३० जण निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट आणि भाजपलाच सत्ता मिळणार, अशी चर्चा यामुळे निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची चढाओढच आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली होती.

अनिल टिंगरे, शीतल सावंत, श्वेता गलांडे, बापूराव कर्णे-गुरुजी, सुनीता गलांडे, रेश्मा भोसले, विजय शेवाळे, बंडू ढोरे, ज्योती कळमकर, दिलीप वेडे-पाटील, अजय खेडेकर, सम्राट थोरात, मनीषा लडकत, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, घोगरे धनराज, कालिंदी पुंडे, संजय घुले, आनंद रिठे, शंकर पवार, राजेश बराटे, हरिदास चरवड, हेमा नवले, नीता दांगट, राजू लायगुडे, प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी, महेश वाबळे, रुपाली धाडवे, राणी भोसले हे तीसजण निवडून आले आहेत. यातील अनिल टिंगरे, शीतल सावंत, बापूराव कर्णे-गुरुजी, सुनीता गलांडे, रेश्मा भोसले, बंडू ढोरे हे नगरसेवक होते, तर उमेदवारी दिलेले अभिजित कदम आणि माजी नगरसेवक राजेंद्र एंडल हे पराभूत झाले. सुनंदा गडाळे यांना भाजपने उमेदवारी नाकारली.