सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता, लोहियानगर-काशेवाडी आदी भागांतील केंद्रांवर तुरळक गर्दी होती. संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी साडेअकरा पर्यंत मतदान केंद्रांवर पाचशे लोकांनीही मतदान केले नव्हते. प्रत्येक मतदान केंद्रावर साडेसातशे मतदारांसाठी दोन बूथ अशी रचना करण्यात आली होती. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर दोन्ही बुथवर पंधराशे मतदारांपैकी साडेतीनशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी होऊ लागली. प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी दीड मिनीट तर ज्येष्ठ नागरिकांना साडेतीन मिनिटे लागत होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांना चार मते देताना संभ्रम  झाल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांची मदत घेत  होते.

* प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर-कासेवाडी आणि प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रस्ता-ससून रुग्णालय हे दोन्ही प्रभाग संवेदनशील असल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे स्वत: या दोन्ही प्रभागातील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून होते. या दोन्ही प्रभागातील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आले होते, तसेच चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक अधिकारी संजय पाटील यांनी दिली.

* प्रभाग क्रमांक १६ मधील काही ठिकाणी एका बुथवर तीन मतदान यंत्रे असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अत्यंत संथ गतीने मतदान पार पडत होते. मंगळवार पेठेतील भीमनगर वसाहतीमधील सावित्रीबाई फुले महिला भवन आणि संत गाडगेबाबा आरोग्य मंदिर येथील मतदान केंद्रात अनेक नागरिकांची नावे मतदार यादीत नसल्याने नावे शोधण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती.

* प्रभाग क्रमांक २८ सॅलिसबरी पार्क येथील ऋतुराज सभागृह येथील मतदान केंद्रात दुपारी अडीच वाजता मतदान यंत्र काम करत नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब विभागीय कार्यालयाला ही माहिती दिली. राजीव गांधी ई-लर्निग सेंटर येथून निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत मतदान यंत्र कार्यान्वित केले. यंत्र शॉर्ट झाल्याने मतदान केल्यानंतर लाइट लागत नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीस मिनिटांनंतर यंत्र कार्यान्वित झाले.

* लोहियानगर-काशेवाडी, ताडीवाला रस्ता-ससून रुग्णालय, सोमवार पेठ, मंगळवार पेठ येथे अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याने सकाळच्या सत्रात केवळ नऊ टक्के मतदान झाले.