शाडूच्या मूर्तीचे पूजन करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी पुणेकरांच्या पुढाकाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रशंसा केली. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधताना मोदी यांनी पर्यावरणपूरक मूर्ती घडविणारे मूर्तिकार अभिजित धोंडफळे आणि ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या कार्याचा सन्मानपूर्वक गौरव करीत ही एक प्रकारे समाजसेवा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
केवळ मूर्ती घडविणे एवढेच काम आम्ही करत नाही, तर देवाचे काम करताना या समाजाचे देणे लागतो ही आमची भावना आहे. त्यामुळेच जलप्रदूषण टाळण्याच्या उद्देशातून आम्ही शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीचाच आग्रह धरतो. गेल्या ७५ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याची थेट पंतप्रधानांनी दखल घेतली याचा मनापासून आनंद झाला असल्याचे अभिजित धोंडफळे यांनी सांगितले. अर्थात डोणजे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याच्या कार्यशाळेमध्ये असल्यामुळे मला ‘मन की बात’ ऐकता आले नाही. मात्र, नंतर मोबाईल सतत वाजू लागला आणि प्रत्येकजण माझे अभिनंदन करीत होता तेव्हा खुद्द पंतप्रधानांनी आमच्या कामाची दखल घेतली असल्याचे समजले, असेही अभिजित यांनी सांगितले.
रास्ता पेठेतील धोंडफळे कला निकेतनला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधानांकडून मिळणारी कौतुकाची थाप उत्साह वाढविणारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वानी शाडूच्या मूर्तीची स्थापना आणि पूजन करावे, असे आवाहन अभिजित यांनी केले. शक्य झाल्यास स्वत:च मातीच्या मूर्ती बनवा. मूर्ती पुरेशी सुबक झाली नाही तरी त्यातून मिळणारा आनंद अलौकिक असेल, असेही त्यांनी सांगितले. धोंडफळे कुटुंबीयांची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि मूर्तिकार नरेश धोंडफळे यांनी कलानिकेतनची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अभिजित यांचे वडील रवींद्र यांनी हे काम पुढे नेले. आता अभिजित हा वारसा चालवीत आहेत.
ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याने पंतप्रधानांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केल्याचे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेचे मनोज देवळेकर यांनी सांगितले. मिरवणुकीमध्ये गुलाल उधळला जाऊ नये ही भूमिका संस्था गेली ५० वर्षे आचरणात आणत आहे.
शाडूची मूर्ती वापरावी एवढे सांगूनच थांबत नाही तर शाडू मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जातात. या मूर्तीचे हौदात किंवा घरामध्ये बादलीत विसर्जन करावे, असे आवाहन केले जात असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून पाना-फुलांनी गणरायाची आरास करावी या आवाहनाला पालकांकडूनही प्रतिसाद लाभला असल्याचे देवळेकर यांनी सांगितले.
कोल्हापुरातील संस्थांचाही उल्लेख
कोल्हापूरच्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या प्रबोधिनी व निसर्गमित्र या संस्थांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला आहे . करवीर नगरीतील सामान्य जनतेच्या प्रतिसादामुळे वाढीस लागलेल्या पर्यावरण चळवळीची थेट मोदी यांनी दाखल घेतल्याने या चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंदाचे भरते आले होते, तर सामान्य जनतेने, पर्यावरणप्रेमी लोकांनी सोशल मीडियाद्वारे दोन्ही संस्थांवर कौतुकाचा वर्षांव केला .