प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीकडून नामंजूर

शहरातील खासगी सोसायटय़ांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी अंदाजपत्रकातील तरतूद वापरण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये अमान्य करण्यात आला. महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे.

खासदार आणि आमदार निधीतून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार खासगी सोसायटय़ांमध्ये काही विकास कामे करण्यात येतात. त्याच धर्तीवर आवश्यक ती परवानगी घेऊन शहरातील जुन्या आणि काही खासगी सोसायटय़ांमध्ये विकासकामे करण्यासाठी अंदाजपत्रकातील तरतूद वापरण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी स्थायी समितीला दिला होता.

शहरात अनेक जुन्या सोसायटय़ा आहेत. यामध्ये वास्तव्यास असलेले नागरिक प्रामाणिकपणे मिळकतकर भरत आहेत. मात्र सोसायटय़ांच्या विकसकाने सोसायटीची नोंदणी न केल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचण येत आहे.

महापालिकेच्या वतीने तेथे सुविधा पुरविण्याची कामे करण्यात यावीत. त्यामुळे प्रामाणिक करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणार नाही, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.

या प्रस्तावावर चर्चा करण्यापूर्वी हा प्रस्ताव स्थायी समितीने अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठविला होता. महापालिकेतर्फे खासगी सोसायटय़ांमध्ये विकासकामे करता येणार नाहीत, असा अभिप्राय प्रशासनाकडून देण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीनेही हा प्रस्ताव अमान्य केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.