जातीयवादी पक्षांच्या पराभवासाठी समविचारी पक्षांशी बोलणी; राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल

जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, याचा पुनरूच्चार करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्याचे स्पष्ट संकेत मंगळवारी दिले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सन्मान राखला जाईल, अशा प्रकारची आघाडी करण्याची आमची तयारी आहे. आघाडीबाबत चर्चा सुरु असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्याबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचेही पवार यांनी सांगितल्यामुळे आघाडीबाबत राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी न करता निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुरु झाली होती. त्यामुळे आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आघाडीबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका होऊन दोन्ही काँग्रेसकडून जागा वाटपासंदर्भातील स्वतंत्र प्रस्ताव देण्यात आले. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा वाढून आघाडीचा निर्णयही रखडला. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करताना अजित पवार यांनी आघाडीबाबत सकारात्मक वक्तव्य केले आणि आघाडी करण्याचे संकेतही दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असली तरी आघाडी नको, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला जागा वाटपाचा प्रस्तावही काँग्रेसला मान्य नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण तसेच दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात प्रभागनिहाय चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सन्मानपूर्वक जागा वाटप करण्याची तयारी दर्शविल्यामुळे आघाडीबाबत काय होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

माजी उपमहापौर राष्ट्रवादीत

मंगळवारी शिवसेना आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नगरसेवक सुनील उर्फ बंडू गायकवाड, तसेच अब्दुल बागवान, कोंढवा येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख इम्रान शेख, नवाज नागरिया, इम्तियाझ शेख, अन्वर मेमन, इब्राहिम शेख, राऊत कुरेशी आणि अय्याज खान यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, पक्षाचे प्रवक्ता अंकुश काकडे, आमदार जयदेव गायकवाड उपस्थित होते.

आम्हाला लढाई करायची नाही; पण जातीयवादी पक्षांचा पराभव करायचा आहे. जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेत माझी चर्चा झाली होती. त्यानुसार आघाडी करण्याचे अधिकार पुणे आणि िपपरी-चिंचवड शहराच्या दोन्ही शहराध्यांना देण्यात आले आहेत. आघाडीचा निर्णय हा युतीवर अवलंबून नाही. सन्मानपूर्वक जागा वाटप झाले तरच आघाडी होऊ शकते. दोघांचाही सन्मान राखत आघाडी करण्याची आमची तयारी आहे.

– अजित पवार