आठ कंपन्यांचा प्रकल्पाला प्रतिसाद

मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असून प्रकल्पातील कामे करण्याची तयारी आठ कंपन्यांनी दर्शविली आहे. त्यात दिल्ली मेट्रो प्रकल्पाचे काम घेतलेल्या जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्टसह टाटा, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यामुळे मेट्रोचे पुढील काम वेगाने होणार असून मेट्रो मार्गाची अंतिम रचना लवकरच महामेट्रोच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या १०.७९ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी महामेट्रो कंपनीकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गिके दरम्यानचा हा टप्पा आहे. या कामासाठी निविदापूर्व बैठकीचे आयोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते. मेट्रोच्या कामाबाबची सविस्तर चर्चा आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन या बैठकीत करण्यात आले. महामेट्रो कंपनीचे प्रकल्प विभागाचे संचालक महेश कुमार, स्थापत्य विभागाचे जवाहर साळुंखे, एस. पी. पाटील या बैठकीत उपस्थित होते. अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, टाटा प्रोजेक्ट, एनसीसी, सिमप्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट, वालेचा इंजिनिअर्स, आयटीपी सिमेंटेशन या कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. निविदा प्रक्रियेतील अटी-शर्तीबाबत आणि पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स पर्यंतच्या मेट्रोच्या रचनेबाबत (अलाइनमेंट) या वेळी प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. या कंपन्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे मार्च महिन्याअखेर पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांची अंतिम रचना करण्यासाठी दिल्ली येथे गुरुवारी (९ मार्च) बैठक होणार आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिके दरम्यान एक भुयारी स्टेशन होण्याची शक्यता आहे. महामेट्रोचे अध्यक्ष आणि केंद्रीय नगर विकास विभागाचे मुख्य सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेच्या रचनेमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.